संसाराची अखेर करता करता आयुष्याची अखेर झाली! नेपाळ विमान अपघातात ठाण्याच्या त्रिपाठी कुटुंबातील चौघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुखाचा संसार सुरू असतानाच काही कारणांमुळे पती-पत्नीमध्ये खटके उडाले आणि दोघांनीही घटस्फोटासाठी थेट न्यायालय गाठले. दोघेही स्वतंत्र राहत होते. पण न्यायालयाने घटस्फोटावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यापूर्वीच नियतीने त्यांना कायमचे वेगळे केले. संसाराची अखेर करता करता दोघांच्याही आयुष्याचीच अखेर झाली. नेपाळमधील विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या ठाण्याच्या त्रिपाठी कुटुंबातील ही करुण कहाणी असून एकाच कुटुंबातील चारही जणांचा अंत झाला. या दुर्घटनेमुळे त्रिपाठी कुटुंबावर अक्षरशः आभाळच कोसळले आहे.

अशोककुमार त्रिपाठी (54) व त्यांची पत्नी वैभवी बांदेकर-त्रिपाठी (51) हे ठाण्याचे. त्यांना धनुष (22) व रुतिका (18) ही दोन मुले. काही कारणांमुळे त्रिपाठी दांपत्याने एकमेकांशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट होते. अशोककुमार त्रिपाठी यांची ओडिशामध्ये स्वतःची एचआर कन्सल्टन्सी फर्म असून ते तेथेच राहत होते. त्यांची पत्नी वैभवी या आपल्या दोन्ही मुलांसह ठाण्याच्या रुस्तुमजी गृहसंकुलात रहायची. वैभवी यादेखील उच्चशिक्षित होत्या. त्या बीकेसी येथील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करायच्या. मुलगा धनुष हादेखील इंजिनीअर असून मुलगी रुतिका शाळेत शिकत होती.

त्रिपाठी दांपत्य वेगळे राहत असले तरी न्यायालयाने अंतिम निर्णय देईपर्यंत दरवर्षी अशोक त्रिपाठी यांना आपल्या कुटुंबासमवेत दहा दिवस राहण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार अशोककुमार त्रिपाठी यांनी आपली पत्नी वैभवीसह मुला-मुलीला सोबत घेऊन नेपाळमध्ये पर्यटनासाठी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सर्व जण सहलीसाठी नेपाळला गेलेही.

खराब हवामानाने घात केला

नेपाळच्या तारा एअर कंपनीच्या छोटय़ा विमानाने रविवारी सकाळी पोखरा येथून त्यांनी उड्डाण केले. या छोटय़ा विमानात एकूण 22 प्रवासी होते. जोमसोम येथे त्यांचे विमान पोचणार होते, पण अचानक खराब हवामानामुळे विमान बेपत्ता झाले. या विमानाचे अवशेष मिळाले असून त्रिपाठी कुटुंबातील चौघांचे मृतदेह ओळखण्याच्याही पलीकडचे आहेत.

घरात आता फक्त 80 वर्षांची वृद्ध आई

ठाण्यातील वैभवी बांदेकर-त्रिपाठी यांच्या ठाण्यातील घरी त्यांची 80 वर्षांची वृद्ध आई राहात होती. त्रिपाठी यांच्या शेजारी राहणाऱया लोकांनी अद्यापि त्यांना विमान अपघाताची घटना सांगितली नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांचे ऑपरेशनदेखील झाले आहे. आता त्यांची समजूत कशी व कोणी काढावी, असा एकच सवाल सतावत आहे. दरम्यान, अशोककुमार त्रिपाठी यांचे पुण्यातील काही नातेवाईक ठाण्यात आले आहेत.