
नेपाळमधील रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला असून, बचावकार्याला वेग आला आहे. नागरिकांचे प्राण वाचवणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी बुधवारी सांगितले. पुरातून आतापर्यंत 11,993 जणांची सुटका करण्यात आली असून, आणखी 3,916 जण बेपत्ता असल्याची माहिती शाह यांनी दिली.
या दुर्घटनेची माहिती सकाळी साडेआठच्या सुमारास मिळाल्यानंतर तातडीने बचाव पथकांना सतर्क करण्यात आले. सकाळी 9.15 वाजता यासंदर्भात बैठक घेण्यात आली आणि हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आले. सकाळी 10.30 वाजेपर्यंत आपत्कालीन बचाव पथके घटनास्थळी रवाना होण्यासाठी तयार होती, असे शाह यांनी सांगितले.
लष्कराची हेलिकॉप्टर बचावकार्यासाठी तैनात
पूरग्रस्त भागात बचावकार्य करण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरना तातडीने सूचना देण्यात आल्या. दुपारी सुमारे 1 वाजता स्थानिक खासदार आणि आमदारांशी संपर्क प्रस्थापित करण्यात यश आले, अशी माहितीही शाह यांनी दिली.
सायंकाळी सुमारे 7 वाजता नागरिकांना पंतप्रधान मदत निधीत योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. रसुवा आणि नुवाकोट या दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.
परदेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांची सुटका करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. बचावकार्यादरम्यान महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. पूरग्रस्तांसाठी मदत सामग्री घेऊन 10 ट्रक रवाना करण्यात आले आहेत.
दरम्यान, नेपाळ सरकारमधील सर्व मंत्र्यांनी आपला एका महिन्याचा पगार मदतकार्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार आणि सुरक्षा यंत्रणांकडून पूरग्रस्त भागात बचाव व मदतकार्य सुरू असून, बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचे प्रयत्नही वेगाने सुरू आहेत.



























































