
दिल्ली येथील एका रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचं वृत्त आहे. याच रुग्णालयातील दोन माजी कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षा रक्षकानेच हे कृत्य केल्याचा आरोप आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीच्या रोहिणी परिसरातील बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 30 ऑक्टोबर रोजी घडली आहे.
ही महिला आपल्या एका नातेवाईकाला बघण्यासाठी रुग्णालयात आली होती. आणि तेथील रुग्णांसोबत राहणाऱ्या लोकांसाठी बनवलेल्या शेल्टरहोममध्ये थांबली होती. रुग्णालयात बाउन्सर म्हणून काम करणारे दोन माजी कर्मचारी आणि एका सुरक्षारक्षकाने महिलेला धमकावलं. तू इथे कशी थांबू शकतेस, अशी विचारणा करून व्हेरिफिकेशनच्या नावाखाली तिला पार्किंगमध्ये घेऊन गेले.
तिथे तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी मनीष (22), प्रवीण तिवारी (24) आणि कंवर पाल (33) या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी तिघांचीही कसून चौकशी करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.

























































