‘इंडियन्सच्या ईमेलला उत्तर देत नाहीत’, न्यूझीलंडच्या मंत्रीचे वादग्रस्त वक्तव्य

न्यूझीलंडच्या इमिग्रेशन मंत्री एरिका स्टॅनफोर्ड यांनी हिंदुस्थानींकडून येणाऱ्या ईमेल्सबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी हिंदुस्थानींकडून येणारे ईमेल्स ‘स्पॅम’सारखे असल्याचे म्हटले आहे, ज्यामुळे हिंदुस्थानी वंशाच्या खासदारांनी आणि समुदायाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यूझीलंडच्या संसदेत बोलताना त्या असं म्हणाल्या आहेत.

न्यूझीलंडच्या संसदेत स्टॅनफोर्ड यांना त्यांच्या खासगी जीमेल अकाउंटवर सरकारी पत्रव्यवहार पाठवल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, “मी ऑफिशियल इन्फॉर्मेशन अ‍ॅक्टचे पालन केले आहे आणि सर्व आवश्यक ईमेल्स माझ्या संसदीय अकाऊंटवर पाठवले आहेत.” यानंतर त्या पुढे म्हणाल्या, “मला खूप सारे अनावश्यक ईमेल्स येतात, उदाहरणार्थ, हिंदुस्थानातून इमिग्रेशन संबंधित सल्ला मागणारे ईमेल्स, ज्यांना मी कधीच उत्तर देत नाही. मी त्यांना जवळपास स्पॅमसारखे मानते.”

या वक्तव्याने न्यूझीलंडमधील हिंदुस्थानी समुदायात संतापाची लाट पसरली. हिंदुस्थानी वंशाच्या लेबर पक्षाच्या खासदार प्रियंका राधाकृष्णन यांनी स्टॅनफोर्ड यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी फेसबुकवर एका पोस्टमध्ये लिहिले, “इमिग्रेशन मंत्र्यांनी एका विशिष्ट देशातील किंवा वंशाच्या लोकांना नकारात्मकरीत्या लक्ष्य करणे अत्यंत चुकीचे आहे. जर तुम्ही हिंदुस्थानातून असाल, तर त्यांना ईमेल पाठवण्याची तसदी घेऊ नका, कारण ते थेट स्पॅममध्ये गणले जाईल.”

वाद वाढल्यानंतर एरिका स्टॅनफोर्ड यांनी आपल्या वक्तव्याचा गैरसमज झाल्याचे सांगत स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या, “मी फक्त एवढेच म्हटले की, मी त्यांना जवळपास स्पॅमसारखे मानते. माझ्या खासगी ईमेलवर येणाऱ्या अनावश्यक ईमेल्सच्या स्वरूपाबाबत आणि संख्येबाबत मी बोलत होते, कोणत्याही विशिष्ट समुदायाबाबत नाही.”