न्यूझीलंडची विजयी वाटचाल कायम, वेस्ट इंडीजचा एक डाव व 134 धावांनी धुव्वा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने मायदेशातील विजयी मालिका रविवारीही कायम ठेवली. केन विल्यमसनच्या किवी संघाने वेस्ट इंडीजचा एक डाव व 134 धावांनी धुव्वा उडवला. मागील 14 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला नाहीए. पहिल्या डावात 251 धावा तडकावणाऱया केन विल्यमसनची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली. दोन देशांमधील ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपअंतर्गत पार पडत आहे. या विजयामुळे न्यूझीलंडला 60 गुणांची कमाई करता आली आहे.

वेस्ट इंडीजने 6 बाद 196 या धावसंख्येवरून रविवारी पुढे खेळायला सुरुवात केली. जर्मेन ब्लॅकवूड व अल्जारी जोसेफ या जोडीने सातव्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी रचली. दोघे खेळपट्टीवर स्थिरावणार असे वाटत असतानाच काईल जेमीसनने अल्जारी जोसेफला 86 धावांवर बाद करीत जोडी तोडली. या खेळीत त्याने 3 षटकार व 9 चौकार चोपून काढले. त्यानंतर वेस्ट इंडीजचे 4 फलंदाज 4 धावांमध्येच पॅव्हेलियनमध्ये परतले. जर्मेन ब्लॅकवूडने 2 षटकार व 11 चौकारांसह 104 धावांची खेळी केली, पण तो संघाचा पराभव वाचवू शकला नाही. हे त्याचे दुसरे कसोटी शतक ठरले. न्यूझीलंडकडून नील वॅगनरने 66 धावा देत 4 फलंदाज बाद केले. काईल जेमीसनने दोन फलंदाज बाद केले.