मानपानाचा खर्च टाळून कालव्याच्या नूतनीकरणाला मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, राहाता

विवाह सोहळ्यातील मानपान व सत्कार समारंभाला फाटा देत, त्यातून बचत झालेले पाच हजार रुपये गोदावरी उजव्याच्या कालव्याच्या नूतनीकरणासाठी लोकवर्गणी म्हणून देऊन रामपूरवाडीच्या जाधव परिवाराने नवा पायंडा पाडला.

राहाता तालुक्यातील रामपूरवाडी येथील शेतकरी रामदास जाधव यांची कन्या व अस्तगाव येथील प्रभाकर गोर्डे यांच्या मुलाचा विवाह रामपूरवाडी येथे झाला. विवाहात उपस्थितांच्या सत्काराचे नियोजन सुरू असताना, पुणतांब्याचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी सत्काराचा खर्च टाळून त्याऐवजी सुरू असलेल्या गोदावरी उजव्या कालव्याच्या रुंदीकरणासाठी मदत करा, असे आवाहन केले. याला उपस्थित शेतकNयांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर सत्कार समारंभाला फाटा देत त्यातील बचत झालेल्या पाच हजार रुपयांचा निधी मुलीचे आजोबा यांनी डॉ. धनवटे व रामपूरवाडीच्या महिला सरपंच सविता जगताप यांच्याकडे सुपूर्द करून राहाता तालुक्यात सुरू झालेल्या एका पाणी चळवळीत सहभाग घेतला.

तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेले रामपूरवाडी हे गाव गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात असतानाही कालव्याच्या दुरवस्थेमुळे पाण्यापासून नेहमीच वंचित राहते. पूर्ण क्षमतेने पाणी कधीच मिळत नाही. नुकतीच लोकसहभागातून कालवा रुंदीकरण मोहीम सुरू झाली. सर्वच शेतकरी यासाठी सरसावले आहेत.विवाह सोहळ्यातील सत्काराला फाटा देत जाधव परिवाराने पाच हजारांचा निधी गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणासाठी सुपूर्त केल्याने त्यांचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.