पोलिसांकडून वृत्तपत्र विक्रेत्यांना नाहक त्रास; विक्रेत्यांची शिवसेनेकडे तक्रार

वाढत्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर  सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू करतानाच मेडिकल, किराणा दुकाने आणि वृत्तपत्र व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे वृत्तपत्रांची छपाई, वितरण, विक्रीवर कोणतेही निर्बंध नाहीत. तरीही पोलिसांकडून वृत्तपत्र विक्रेत्यांना नाहक त्रास दिला जात आहे. मुंबईत  अनेक ठिकाणी पोलिसांनी वृत्तपत्र विक्रीचे स्टॉल बंद करायला भाग पाडले. याबाबत वृत्तपत्र विक्रेत्यांनी शिवसेनेकडे तक्रार केली आहे.

कोरोना महामारी सुरू झाल्यापासून वृत्तपत्र व्यवसायाबरोबरच वृत्तपत्र विक्रेत्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वृत्तपत्र-मासिकांची विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱया विक्रेत्यांना वारंवार आलेल्या संकटांमुळे व्यवसाय करणे कठीण झाले आहे. तरीही ते आपल्या आरोग्याची काळजी घेत वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहचवण्याचे काम अविरतपणे करत आहेत. मात्र आता कोरोनाचा संसर्ग वाढू लागताच राज्य सरकारने गर्दी कमी करण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. सदर निर्बंध लागू करताना सरकारने वृत्तपत्र व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा दिला आहे. त्यानुसार वृत्तपत्रांच्या विक्रीवर कोणतेही निर्बंध नाहीत. तरीही पोलिसांकडून जबरदस्तीने वृत्तपत्र विक्रीचे स्टॉल बंद केले जात असल्याची तक्रार वृत्तपत्र विक्रेत्यांनी शिवसेना नेते-उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. तसेच परवानगी असूनही पोलीस जर आमचा व्यवसाय जबरदस्तीने बंद करत असतील तर वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहचणार कशी, आम्ही जगायचे कसे, असा सवाल केला आहे. दरम्यान, सुभाष देसाई यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या तक्रारीची दखल घेत संबंधित विभागाच्या सचिवांसोबत तत्काळ चर्चा करून तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या