आगामी निवडणुकीत राज्यात परिवर्तन होऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक

आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात निश्चितपणे परिवर्तन होईल, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, मंत्रीमंडळही शिवसेनेचेच असेल, असा विश्वास शिवसेना नेते, उत्तर महाराष्ट्र विभागीय नेते, खासदार संजय राऊत यांनी येथे व्यक्त केला. स्वबळाची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वारंवार मांडली आहे, त्यादृष्टीनेच आमची रचना सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक येथे शासकीय विश्रामगृहात खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेची स्वबळाची भूमिका राष्ट्रीय कार्यकारिणीत ठरली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हीच भूमिका वारंवार मांडली आहे. आमची संपूर्ण रचना त्यादृष्टीने सुरू आहे. आगामी निवडणुकीत परिवर्तन होईल, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, मंत्रीमंडळही आमचेच असेल, अशी आम्हाला खात्री आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्र शिवसेनेला सत्तेचा मार्ग दाखवील, असे आशादायक वातावरण असल्याचेही त्यांनी सांगितले. युती होईल असे सांगणारे भाजपावाले शिवसेनेचे प्रवक्ते नाहीत, असा टोलाही त्यांनी हाणला. 2014 साली तोडलेली युती आता 2019ला व्हावी, असे भाजपाला का वाटते, असा कोणता फरक झालाय की आता युती करण्याची दाट इच्छा होतेय, असेही त्यांनी भाजपाला सुनावले. चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन बांधा, या जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना ते म्हणाले की, आगामी निवडणुकीत या भाजपाच्या मंत्र्यांना मतदार पाहुण्यांकडेच बसवतील.

या पत्रकार परिषदेस जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुहास कांदे, सुनील पाटील, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, सुधाकर बडगुजर, भगवान भोगे, राहुल दराडे आदी हजर होते.

दैवी शक्ती आहे, तर सर्व प्रश्न सोडवा
‘सामना’च्या अग्रलेखात जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचा आरतीबाज असा उल्लेख केला होता, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, त्यावर संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या अंगी दैवी शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या जोरावर ते अनेक निर्णय घेतात, विषय सोडवतात, असे विधान गिरीष महाजन यांनी केले होते. त्यावर आम्ही केलेलं विधान आहे की, हे आरती ओवाळणं बंद केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, दुष्काळ आहे. धुळ्यात आठ दिवसांनी एक ते दीड तास पाणी मिळते. स्वत: महाजनांच्या जामनेरमध्ये पंधरा-पंधरा दिवस लोकांना पाणी मिळत नाही, मग त्यांनी दैवी शक्तीच्या जोरावर दुष्काळ दूर केला पाहिजे. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, पाणी दिले पाहिजे. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवली पाहिजे. निवडणुकाही लढू नका. तुम्ही पक्ष कार्यालयात एक दैवी शक्ती असलेला माणूस बसवा आणि राज्यातले सर्व प्रश्न सोडवा, असा टोलाही त्यांनी हाणला. महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे. गिरीष महाजन यांचे विधान त्या कायद्यांतर्गत येते. त्यावर कारवाई होवू शकते, म्हणून त्यांना आम्ही सावध केलंय, बाकी काही नाही, असेही ते म्हणाले. निदान मंत्र्यांनी तरी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची अशाप्रकारे आरती करू नये, असं आमचं म्हणणं असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जानेवारीत उद्धव ठाकरे यांची सभा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यातील शरयू नदीवरील आरतीच्या नियोजनाची जबाबदारी नाशिकच्या शिवसेनेच्या टिमने यशस्वीपणे पार पाडली. येत्या जानेवारीत उद्धव ठाकरे हे नाशिकला येणार आहेत, त्यांची येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सभा होईल. शरयूप्रमाणेच पवित्र गोदावरी नदीच्या तिरावर कार्यक्रम घेण्यात येईल, त्याचीही तयारी सुरू असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या उद्रेकाची सरकारला भिती
महाराष्ट्रात केंद्रीय पथकाचा दुष्काळ पाहणी दौरा सुरू आहे. शेतकरी त्यांच्यासमोर वेदना मांडतायेत, ते आज ‘सामना’च्या अग्रलेखातून मांडले आहे. दुष्काळाच्या अनेक घोषणा झाल्या, आमच्यापर्यंत काही पोहोचले नाही. कर्ज माफ झाले नाही. खरीपाची पिके गेली, त्याची नुकसानभरपाई मिळालेली नाही. आम्ही जगायचं कसं, आमच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, अशी व्यथा करमाळ्याच्या जातेगाव येथील शेतकरी किसन वारे यांनी या पथकापुढे मांडली. निफाडच्या नैताळेतील शेतकरी संजय साठे याने मातीमोल भावात विकल्या गेलेल्या कांद्याच्या पैशांची मनीऑर्डर पंतप्रधानांना पाठविली. त्यालाच गुन्हेगार ठरविले जात आहे. हे दोन्हीही विषय महाराष्ट्रासाठी गंभीर व महत्त्वाचे आहेत. शेतकरी संतापलेला आहे, त्याचा उद्रेक झाला तर पथकाच्या जीवाला धोका निर्माण होईल, अशी भिती सरकारला वाटतेय, म्हणून या पथकाला झेड प्लस सिक्युरिटी दिली आहे. बॉडीगार्ड घेऊन हे पथक पाहणी करतंय. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची मानसिक अवस्था काय आहे, हे दाखविणारा हा प्रसंग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.