हॉलीवूडच्या अभिनेत्याची अजब कहाणी, अवघ्या 4 दिवसात चौथ्या पत्नीला दिला घटस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता-अभिनेत्रीचा घटस्फोट हे हॉलीवूडसाठी नवीन नाही. पण अवघ्या चार दिवसांत चौथ्या पत्नीला घटस्फोट देणारा अभिनेता निकोलस केज सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. अमेरिकी अभिनेता आणि चित्रपट निर्माता निकोलस केज(55) आणि अभिनेत्री इरिका कोएके(35) यांचा 23 मार्च रोजी लास वेगास इथे विवाह सोहळा पार पडला आणि फक्त चार दिवसातच त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. चित्रपटासारखाच अगदी वेगानं त्यांचा संसार आटोपल्याने ते दोघे चर्चेत आले आहेत.

23 मार्च रोजी लास वेगास इथे निकोलस आणि इरिकाचा विवाह पार पडला आणि 31 मे रोजी त्यांनी घटस्फोट घेतला. खरं तर लग्न आणि घटस्फोटात तीन महिन्यांचा काळ गेल्याचे दिसते. मात्र आता नवीन बातमी समोर आली आहे की केजने लग्नानंतर अवघ्या चार दिवसांत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. ज्यावर अंतिम निर्णय तीन महिन्यांनी म्हणजे 31 रोजी देण्यात आला.

इंग्रजी वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, केज आणि इरिका एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यानंतर त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. इरिका ही केजची चौथी पत्नी ठरली. 23 मार्च रोजी थाटामाटात सोहळा उरकल्यानंतर चार तासांतच त्यांच्यात ‘तू तू मै मै’ सुरू झाले. हा वाद इतका टोकाला गेला की चौथ्या दिवशी केजने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला.

न्यायालयाच्या कागदपत्रामध्ये असा दावा केला की, आपण नशेत असताना इरिकाला लग्न करण्याची मागणी घातली होती. तसेच केजने म्हणतो की, आमचं नात खोट्या आणाभाकांवर उभं होतं. इरिकानं माझ्यापासून काही गोष्टी लपवल्या. इरिका ही गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे आणि तिचे दुसऱ्या एका व्यक्तीसोबत अनैतिक संबध आहे. याबद्दल तिनं मला कधीच सांगितलेलं नाही. त्यामुळे असत्यावर झालेलं हे लग्न मला मान्य नसून घटोस्फोट हवा आहे, अशी मागणी त्याने केल्याचे वृत्तात म्हटले आहे.

वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, लग्नाच्यात दिवशी झालेल्या जोरदार वादामुळे केज त्या बंधनात राहण्यास तयार नव्हता. असे असले तरी इरिका मात्र केजपासून वेगळं होण्यास तयार नव्हती. तिने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु केज काही केल्या ऐकण्यास तयार नव्हता. घटस्फोटावर तो ठाम होता. अखेर त्यांचा घटस्फोट झाला आणि त्याची मोठी किंमत केजला मोजावी लागणार आहे.

केज चौथ्यांदा घटस्फोटाच्या पायरीवर आहे. इरिकाशी संबंध जुळण्याअगोदर तो अॅलिस किम सोबत राहत होता. 2001 ते 2016 या अशी 16 वर्ष त्या दोघांनी एकत्र काढली होती. मात्र याच दरम्यान, इरिकाची त्याच्या जीवनात एन्ट्री झाल्याचेही बोलले जाते.