निलेश लंके भेटीसाठी मातोश्रीवर; उद्धव ठाकरे यांचे घेतले आशिर्वाद

आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडी राज्यात सर्वाधिक जागा जिंकणार असल्याचा दावा नगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याची सुरूवात नगर जिल्हयातून करावी, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला सांगितल्याचे लंके म्हणाले. लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर शनिवारी निलेश लंके यांनी मुंबईत मातोश्री निवासस्थानी जात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेत त्यांचे आशिर्वाद घेतले. त्यांनंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

लवकरात लवकर तारीख निश्‍चित करून नगरमध्ये महाविकास आघाडीच्या मोठया मेळाव्याचे नियेाजन करण्यात येणार असल्याचे खासदार लंके म्हणाले. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आशिर्वाद घेउनच दिल्लीला शपथ घेण्यासाठी जाण्याचा निर्धार आपण केला होता. मी रविवारी दिल्लीला जाणार आहे. त्यामुळे आज उध्दव ठाकरे यांची भेट घेत त्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आल्याचे लंके यांनी सांगितले. मातोश्रीला भेटीवेळी लंके यांनी हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आसनाचे दर्शन घेतले.

आपला राजकीय प्रवास शिवसेनेपासून सुरू झाला. शाखाप्रमुख, उपगणप्रमुख, गण, गट, उप तालुकाप्रमुख या पदांवर काम करताना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून प्रेरणा घेत काम केल्याचे त्यांनी सांगितले. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. नगर जिल्हयात अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे आजही बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे यांच्याकडून प्रेरणा घेत काम करत असल्याचे लंके म्हणाले.

पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची मागणी केली आहे. यावर लंके म्हणाले, त्यांना काय करायचे असेल ते करू द्या, काही लोकांना पराभव मान्य नसतो. त्यामुळे ते असे उद्योग करत असतात. त्याकडे दुर्लक्ष करून आपण आपले काम करत रहायचे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर नगर जिल्हयातील सर्व 12 आमदार महाविकास आघाडीचे निवडून आणण्याचा निर्धार केल्याचे लंके यांनी सांगितले. लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी येता आले नाही याबाबत उध्दव ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. मात्र, माझ्या विजयामुळे उध्दव ठाकरे यांना अत्यानंद झाला. माझ्यासारखा कार्यकर्ता खासदार झाला त्याचा त्यांना आनंद आहे. आम्ही एकाच परीवारातील आहोत, असेही लंके यांनी सांगितले.

पारनेरच्या डिझाईनचा फलक मातोश्रीबाहेर!
पारनेरचा ढाण्या वाघ मातोश्रीवर अशा आशयाचे डिझाईन करणाऱ्या तालुक्यातील सारोळा आडवाई येथील ग्राफीक्स डिझाईनर सुदेश आबूज याचा फलक मातोश्रीबाहेर झळकला होता. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.