
दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कामासाठी अनेक अडचणी आल्या या सर्व अडचणींवर मात करून आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्शवत प्रकल्प आपण राबविला. निळवंडे धरण व कालव्यांची कामे आपल्या हातून होणे हे नियतीच्याच मनात होते. म्हणून पुन्हा सत्तेत आल्यानंतर या कामाला गती दिली. 2022 च्या मध्यापर्यंत दुष्काळी भागाला पाणी देण्याचा आपला प्रयत्न असून यासाठी कालव्यांची कामे अत्यंत जलद गतीने सुरू असल्याचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
देवकौठे येथे जगदंबा दूध संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. तर व्यासपीठावर नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, सुनंदाताई जोर्वेकर, मीराताई शेटे, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, गणपतराव सांगळे, साहेबराव गडाख, अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे, प्रभाकर कांदळकर, विष्णुपंत रहाटळ, भारतशेठ मुंगसे, भागवतराव आरोटे, एकनाथ मुंगसे, सुभाषराव सांगळे, चेअरमन राजेंद्र मुंगसे, व्हाईस चेअरमन नामदेव आरोटे, राजेंद्र कहांडळ, ज्योती मोकळ, अनिल गाजरे, विलास मुंगसे, रामनाथ शेवकर आदी उपस्थित होते.
यावेळी सोसायटीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन व विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी बाळासाहेब थोरात म्हणाले की, निळवंडे धरण पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देणे हा आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असणार आहे. या धरणासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. अनंत अडचणींवर मात करत धरण पूर्ण केले. कालव्यांसाठी मोठे बोगद्यांची कामे मार्गी लावली. मात्र मागील भाजप सरकारच्या काळात पाच वर्षे कामे थांबली होती. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर जेथे कालव्यांच्या कामावर दोन जेसीबी कार्यरत होते, तेथे आता 35 जेसीबी रात्रंदिवस काम करत आहे. दोन्ही कालव्यांची कामे अत्यंत वेगाने सुरू आहेत. ज्यावेळेस अडचणी येतात त्यावेळेस चर्चेने आपण मार्ग काढून कामे सुरू ठेवतो. हे कामे लवकरात लवकर पूर्ण करून 2022 च्या मध्यापर्यंत या भागाला पाणी देणे हा आपला ध्यास आहे, असं ते म्हणाले.
थोरात पुढे म्हणाले की, तालुक्यातील जनतेने आपल्यावर खूप प्रेम केले आहे.पक्षानेही मोठा विश्वास टाकला आहे. आपण अडचणीच्या काळात प्रदेशाध्यक्ष पद सांभाळताना पक्षाला मोठे यश मिळवून दिले. महसूलमंत्री पदाची मोठी जबाबदारी आहे. तरीही तालुक्यातील सहकारी संस्था व गावांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. देवकौठे गावाने अंडी उत्पादन व दुधातून मोठी क्रांती केली आहे हे इतरांसाठी मार्गदर्शक आहे. आपण सातत्याने काम करतो त्यामुळे संगमनेरचा लौकिक राज्यात निर्माण झाला आहे. या परिसरातून हैदराबाद सुरत मार्ग जातो आहे. समृद्धी महामार्ग जवळ आहे. रेल्वे महामार्ग जातो आहे. विमानतळ जवळ आहे, त्यामुळे आगामी काळामध्ये तळेगाव परिसरात नक्कीच मोठी समृद्धी होणार असल्याचेही ते म्हणाले.
तर आमदार डॉ. तांबे म्हणाले की देवकौठे गावाने प्रतिकूलतेवर मात करून अनुकूलता निर्माण केली आहे. या गावातील माणसे अत्यंत चांगली आहेत. गावचा एकोपा असेल तर गावचा किती विकास होऊ शकतो याचा मापदंड म्हणजे देवकौठे आहे. दुष्काळी भागात असूनही मोठे दूध संकलन व अंडे विक्री या ठिकाणी होत आहे. बाळासाहेब थोरात यांचे सातत्याने मार्गदर्शन या गावाला असून या गावचा आदर्श इतरांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले
तर नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, जिल्ह्याच्या टोकावर असणाऱ्या देवकौठे ने दुग्ध व अंडे उत्पादनातून मोठी क्रांती केली आहे आज तालुक्याच्या नकाशावर हे गाव ठळक दिसते आहे. या गावातील वैभव बदलले असून वीस वर्षांपूर्वी चे गाव आता जणू एक शहरा लग्नाचे मोठे गाव म्हणून जाणवत आहे यामध्ये गावच्या नागरिकांचा मोठा सहभाग असल्याचे त्या म्हणाल्या
या प्रसंगी भारत शेठ मुंगसे म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने या गावात प्रेम केले असून विविध विकासाच्या योजना दिले आहेत या पुढील काळातही हा विकासाचा एकोपा कायम ठेवताना आपण सर्वजण थोरात यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, तर भागवतराव आरोटे म्हणाले की, सतत काम करण्याची प्रेरणा कायम बाळासाहेब थोरात यांच्या व्यक्तिमत्त्वातून मिळते. त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. सर्वांना बरोबर घेत विकासाचे काम केले आहे, असे नेतृत्व तालुक्याला लाभले हे आपले भाग्य आहे. तर सुभाषराव सांगळे म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांनी राज्यात व देशात आपल्या कर्तृत्वाने मोठे स्थान निर्माण केले आहे. मात्र तालुक्यातील जनतेच्या सुखदुःखाची दररोज ते काळजी घेत असतात असेही ते म्हणाले. यावेळी सचिन दिघे, विजय गोडगे, विश्वनाथ आरोटे, सजन मुंगसे, बाळासाहेब गुडघे, विलास मुंगसे, विकास मुंगसे, साहेबराव कहांडळ, शिवराज मुंगसे, संजय लहारे, प्रवीण सोनवणे, शिवराज मुंगसे आदी उपस्थित होते.
























































