
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशाच्या पूर्णवेळ पहिल्या संरक्षण मंत्री होण्याचा मान निर्मला सीतारमण यांनी मिळाला होता. आता पुन्हा त्यांनी देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री होण्याचा मान मिळाला आहे.
23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. त्यात भाजपला बहुमत मिळून दणदणीत विजय मिळाला होता. गुरूवारी एनडीच्या शपथविधीचा सोहळा झाल्यानंतर शुक्रवारी मंत्रिपद जाहीर करण्यात आले. संरक्षणमंत्रिपद राजनाथ सिंह यांना देण्यात आले. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आरोग्याच्या कारणास्तव मंत्रिपदाची जबाबदारी नाकारली होती. तेव्हा अर्थमंत्रिपद कोणला मिळणार याबाबत उत्सुकता होती. पियुष गोयल यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाईल असा अंदाज व्यक्त होत असताना निर्मला सीतारमण यांच्याकडे अर्थ मंत्रालय सोपवण्यात आले आहे. संरक्षण मंत्रिपदावर पूर्णवेळ फक्त पुरुष मंत्री होऊन गेले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्याकडे या खात्याची जबाबदारी होती.
2014 साली भाजपचे सरकार आल्यानंतर संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी अरुण जेटली यांच्याकडे होती. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे ते पद सोपवण्यात आले. मात्र गोवा विधानसभा निवडणुकीनंतर पर्रिकर स्वगृही परतले. सहा महिन्यांसाठी जेटली यांच्याकडे संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी होती. अखेर 3 सप्टेंबर 2017 रोजी निर्मला सीतारमण यांनी संरक्षण मंत्रिपदाची शपथ घेतली. पूर्णवेळ पहिल्या संरक्षण मंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. आताही केंद्रीय अर्थमंत्री पद मिळाल्यानंतर त्यांना हा मान पुन्हा मिळाला आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्याकडे या खात्याची जबाबदारी होती. आता निर्मला सीतारमण यांना पूर्णवेळ अर्थ खात्याची जबाबदारी मिळाली आहे.
























































