अजून ध्येय कुठे पूर्ण झालेय! विजयानंतर एकटाच बसलेल्या निशामची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अबुधाबीत बुधवारी लढाऊ न्यूझीलंडने फॉर्मात असलेल्या इंग्लंडला पराभूत करीत टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच मजल मारली. या ऐतिहासिक विजयानंतर न्यूझीलंडचे सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये विजयाचा जल्लोष साजरे करत असताना  जिमी निशाम मात्र मैदानात एकटाच खुर्ची टाकून बसला होता. त्याला पत्रकारांनी का चिंताग्रस्त बसलायस, असे विचारले असता तो म्हणाला, आमचे ध्येय अजून कुठे पूर्ण झालेय? मी अंतिम लढतीतील विजयाचा विचार करतोय. त्यामुळे आज जल्लोषात सामील होण्यात मला रस नाहीय. निशामच्या या उत्तराने त्याने सर्वांची मने जिंकली.

कालच्या टी-20 उपांत्य लढतीत न्यूझीलंडला शेवटच्या हाणामारीच्या षटकांत प्रति षटक 12 धावांहून अधिकच्या सरासरीने धावांचा रतीब पाडायचा होता. याच वेळी अष्टपैलू निशाम संघाच्या मदतीला धावून आला. त्याने 3 षटकार आणि 1 चौकाराची बरसात करीत केवळ 11 चेंडूंत 27 धावांची वेगवान खेळी केल्याने न्यूझीलंडचा विजय सुकर झाला होता. 16व्या ते 18व्या षटकांत निशामची ही आतिषबाजी क्रिकेटशौकिनांना पाहायला मिळाली. मात्र संघाच्या उपांत्य विजयाने त्याचे समाधान झालेले नाही.अंतिम फेरीत विजया मिळवून टी-20 विश्वचषक हाती घेईन तेव्हाच विजयाच्या जल्लोषात सहभागी होईन असे उत्तर निशामने पत्रकारांना दिले.

किवीजची तिसरी आयसीसी फायनल

झुंझार न्यूझीलंडने सलग तिसऱयांदा आयसीसी स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे. 2019 चा वन डे विश्वचषक  आणि यंदाच्या आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा भीमपराक्रम किवीजनी केला आहे. 2019 च्या वन  डे विश्वचषक अंतिम लढतीत इंग्लंडविरुद्ध केवळ चौकारांच्या संख्येवरून पत्करलेला पराभव न्यूझीलंड संघाच्या जिव्हारी लागला होता. त्याचेच उट्टे त्यांनी काल अबुधाबीत फेडले आहे.