
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सीबीआयमधील वादावर चौकशी करणाऱ्या केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना अद्याप ‘क्लीन चिट’ दिली नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. ‘सीव्हीसी’च्या अहवालावर वर्मा यांनी सोमवारपर्यंत सीलबंद पाकिटात लेखी स्पष्टीकरण द्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, ‘सीव्हीसी’ने वर्मा यांच्यावरील आरोपांबाबत काही पूरक माहिती दिली आहे. तर बरेच मुद्दे अस्पष्ट आहेत, असे मत न्यायालयाने यावेळी मांडले आहे.
बंद लिफाफ्यात उत्तर द्या!
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील न्या. एस. के. कौल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावर सरन्यायाधीश म्हणाले, ‘सीव्हीसी’ने वर्मा यांच्याबाबत दिलेल्या चौकशी अहवालात बरीच पूरक माहिती आहे. तसेच बऱ्याच प्रमाणात अस्पष्टही आहे. ‘सीव्हीसी’ला चौकशीसाठी आणखी वेळ हवा आहे. वर्मा यांनी ‘सीव्हीसी’चा अहवाल बंद लिफाफ्यात दिला आहे. वर्मा यांनीही सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आपले लेखी उत्तर बंद लिफाफ्यात सादर करावे. पुढील सुनावणी 20 नोव्हेंबरला होणार आहे.
























































