दिघोळ ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधातील अविश्वास ठराव मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जामखेड

तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली नायब तहसीलदार अविनाश रणदिवे, अभिजित लवळे, खेत्रे यांच्या उपस्थितीत बुधवारी अविश्वास ठरावावर ग्रामपंचायत कार्यालयावर सभा घेण्यात आली. यावेळी 11 सदस्य उपस्थित होते. यापैकी गहिनीनाथ गिते, रामभाऊ रसाळ, यमुनाबाई सदाशिव रंधवे, निलावती मच्छिंद्र गिते, आशाबाई भिमराव तागड, शितल सुरेश गिते, अंबादास आवारे, सुनिता बाळु राजगुरू या आठ सदस्यांनी सरपंच दत्तात्रय होनमाने यांच्याविरोधात हातवर करून अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. तर अविश्वास ठरावाच्या बाजूने सरपंच दत्तात्रय होनमाने, बळीराम तागड, विद्या विटकर यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. यामुळे अविश्वास ठराव आठ विरूद्ध तीन मतांनी मंजूर झाला आहे. दत्तात्रेय होनमाने हे मनमानी कारभार करतात सदस्यांना विश्वासात घेत नाहीत अशा विविध कारणांमुळे आठ सदस्यांनी 24 मे रोजी तहसीलदार विशाल नाईकवडे यांच्याकडे सरपंचा विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता.

जामखेड तालुक्यातील दिघोळ माळेवाडी ग्रुप ग्रामपंचायत पालकमंत्री राम शिंदे यांच्या गटाची आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतला महत्त्व आहे. या ग्रामपंचायतीमध्ये एकुण 11 सदस्य आहेत. हे सर्व सदस्य एकाच गटाचे आहेत. येथे सरपंच म्हणून दत्तात्रेय होनमाने हे गेले तीन वर्षापासून कारभार पाहत आहेत. परंतु दोन वर्षांपासून सरपंच व सदस्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे धुसफूस सुरू आहे. यातील काही सदस्यांनी दोन वेळा सरपंचावर अविश्वास आणण्यासाठी प्रयत्न केले, पण यश आले नाही शेवटी 24 मे रोजी तहसीलदार विशाल नाईकवडे यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. यानुसार बुधवारी अविश्वास ठरावावर मतदान झाले. अविश्वास ठरावावेळी गावातील महिला व नागरिक रस्त्यावर उतरून सरपंचांच्या बाजूने मोठ मोठ्या घोषणा देत अविश्वास ठरावाचा निषेध केला. काळे झेंडे दाखवले यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. साहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.

सरपंच दत्तात्रय होनमाने यांनी ग्रामस्थांसमोर बोलताना सांगितले की, मी पारदर्शक कारभार करत आसताना विरोधक नेहमी बोगस बिले काढण्यासाठी माझ्यावर दबाव आणत होते. या राजकीय आकसातून अविश्वास ठराव आणला आहे. सरपंच दत्तात्रय होनमाने हे सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत होते. यामुळे आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवली आहे, असे ज्येष्ठ सदस्य रोहिदास ढसाळ व मच्छिंद्र गिते यांनी सांगितले.