
सामना प्रतिनिधी । मालवण
गोवा सरकारने अन्य राज्यातून येणाऱ्या मासळीवर निर्बंध घातल्याने त्याचा मोठा परिणाम सिंधुदुर्गावर झाला आहे. गोवा सरकार आपल्या निर्णयावर ठाम असून राज्य सरकारही कोणतीही मध्यस्थी करत नसल्याने सिंधुदुर्गातील मत्स्य व्यवसायिक हवालदिल झाला आहे. मालवणातील मत्स्य व्यावसायिकांनी मत्स्य विक्री बंद ठेवत गॊवा सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवला आहे.
गेल्या १० दिवसांपासून सिंधुदुर्गातुन गोवा राज्यात मासळी वाहतूक करणाऱ्या वाहनांना निर्बंध घालण्यात आले आहे. इन्सुलेटेड वाहन सक्ती, अन्न व औषध प्रशासन प्रमाणपत्र अश्या जाचक अटी घालण्यात आल्या. मासळी वाहतूक बंद झाल्याने मासळी व्यवसायावर परिणाम होऊन लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली. याबाबत कोणताही तोडगा निघत नसल्याची स्थिती आहे.
सिंधुदुर्गाबाहेर पाठवली जाणारी मासळी वाहतूकीचे मोठे केंद्र गोवा राज्य होते. मात्र त्या ठिकाणी मासळीची निर्यात ठप्प झाल्याने सिंधुदुर्गात मिळणाऱ्या मासळीच्या दरावरही परिणाम झाला आहे. इन्सुलेटेड वाहन सक्ती असली तरी तात्काळ नवे वाहन खरेदी करणे अथवा त्या पद्धतीचे वाहन तयार करणे आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. तसेच कमी कालावधीत ते शक्यही नाही.
संघर्षाची स्थिती निर्माण होणार
गोवा सरकारने अन्यायकारक पद्धतीने जाचक निर्बंध लादले आहेत. अश्या स्थितीत सर्वत्र दिवाळी सण उत्साहात साजरा होत असल्याने सिंधुदुर्गातील मत्स्य व्यवसायिक शांत आहेत. मात्र जाचक निर्बंधात शिथिलता न मिळाल्यास येथील मत्स्य व्यावसायिकांच्या संयमाचा बांध फुटून संघर्षाची स्थिती निर्माण होईल. त्यामुळे गोवा-सिंधुदुर्ग संघर्ष अटळ असल्याचे मत्स्य व्यवसासिक हरी खोबरेकर यांनी सांगितले.































































