
सामना प्रतिनिधी । लातूर
शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनाची खिचडी सध्या बंद झालेली आहे. शालेय पोषण आहाराच्या साहित्याचा पुरवठा करण्यात आलेला नसल्याकारणाने ही खिचडी शिजवली जात नाही. शाळेत खिचडी शिजवत नसल्यामुळे त्याचा रोष मात्र शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांना सहन करावा लागत आहे.
शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन म्हणून शाळेत खिचडी शिजवून दिली जाते. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य पुरवठा करण्यात येते. खिचडी शिजविण्याचे काम गावातील महिला बचत गटांना सोपवण्यात आले आहे. परंतु मागील एक महिन्यापासून लातूर जिल्ह्यातील अनेक शाळांमधील खिचडी बंद झालेली आहे. काही शाळांमध्ये तांदूळ शिल्लक आहे तर दाळ उपलब्ध नाही. तिखट, मीठ , तेल, हळद याचा पुरवठा झालेला नाही. विद्यार्थी-पालकांचा रोष नको म्हणून काही शाळेच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी स्वखर्चातून साहित्य घेऊन काही दिवस खिचडी शिजविण्याचे काम केले परंतु पुरवठा होत नसल्याने व यानंतर होईल की नाही याची शक्यता नसल्याने खिचडी शिजवणे बंद करून टाकण्यात आले आहे.
साहित्य पुरवठा करण्यासाठी ज्या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली होती त्याची मुदत संपली असल्यामुळे व नवीन कंत्राटदार नियुक्त करण्यात आलेला नाही म्हणून साहित्याचा पुरवठा शाळांमधून झालेला नाही. परंतु सध्या मात्र खिचडी नसल्याने विद्यार्थी आणि पालकांचा रोष शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना सहन करावा लागत आहे.
लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ 1 मार्च पासून बदलण्यात आलेले आहे. सकाळी आठ वाजता सुरु होणारी शाळा दुपारपर्यंत आहे त्यामुळे सकाळी उपाशीपोटी शाळेत येतात. दुपारपर्यंत त्यांना शाळेत थांबावे लागत असून विद्यार्थ्यांच्या तब्येतीवर परिणाम होतोय.




























































