
मुंबईत कोरोना पूर्ण नियंत्रणात असला तरी अजूनही दररोज सुमारे 300 तर महिनाभरात 13 ते 14 हजार रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे समुद्रकिनारी मोठय़ा संख्येने गर्दीत साजऱया होणाऱया छटपूजेला यावर्षी परवानगी नाकारण्यात आली असून कृत्रीम तलाव तयार करून आणि कोरोना नियम पाळून छटपूजा साजरी करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहेत. कोणत्याही ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
उत्तर भारतीय समाजाकडून दरवर्षी मोठय़ा उत्साहात छटपूजा सण साजरा केला जातो. समुद्रकिनारी, तलाव, नदी किनारी सूर्योदय व सूर्यास्तच्या दरम्यानच्या कालावधीत मोठय़ा संख्येने महिला, भाविक यासाठी जमा होतात. यावर्षी 10 व 11 नोव्हेंबर रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. मात्र कोरोना रुग्ण अजूनही आढळत असल्यामुळे छटपूजा मर्यादित स्वरूपात साजरा करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत. याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
अशी आहे नियमावली
- फक्त पूजेसाठी परवानगी असेल. सामूहिक सोहळ्यात केरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असणे आवश्यक.
- छटपूजेच्या ठिकाणी सॅनिटायझेशन आणि थर्मल क्रिनिंगची व्यवस्था करावी लागेल.
- पूजेच्या ठिकाणी कोविड वैद्यकीय पथक ठेवण्यात यावे व आवश्यकतेनुसार भाविकांची कोरोना चाचणी करावी.
- कृत्रीम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात यावेत.
संस्थांना कृत्रीम तलाव स्वखर्चाने तयार करता येणार
- छटपूजेसाठी कृत्रीम तलाव स्वखर्चाने उभारण्यासाठी संस्थांना विभाग स्तरावर परवानगी दिली जाणार आहे. मात्र छटपूजेनंतर कृत्रीम तलाव बुजवण्याची जबाबदारी त्या संस्थेची असेल. मात्र या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग पाळण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची असेल. मास्कचा वापर करावा लागेल.
- खुल्या जागेत होणाऱया कार्यक्रमासाठी 50 टक्के आणि जास्तीत जास्त 200 व्यक्ती ही मर्यादा राहणार आहे. तर बंदिस्त जागेत होणाऱया कार्यक्रमासाठी एकूण क्षमतेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 100 व्यक्ती ही मर्यादा असेल.































































