
सामना प्रतिनिधी । वाढवणा
येथुन जवळच असलेल्या गुडसुर जिल्हा परिषद शाळेत क्रिडा शिक्षक व दोन वर्षांपासुन सेवक नाही. सेवक नसल्याने शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना साफसफाई करावी लागते. यामुळे पालक प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
जिल्हा परिषद शाळा पहिली ते दहावी पर्यंत असुन या शाळेत २७० विद्यार्थी आहेत. ही शाळा जुनी असुन शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. या ठिकाणी क्रिडा शिक्षक व सेवक नसल्याने शाळकरी मुलांच्या हातात झाडु आला आहे. गावातील ग्रामस्थांनी पुढाऱ्यांनी अनेकवेळा शिक्षण सभापती लातुर, जिल्हा परिषद अध्यक्ष लातुर व शिक्षण विभागास माहिती देऊन स्वतः जाऊन सांगितल्यानंतरही सेविकाची नियुक्ती केली जात नाही. दोन वर्ष झाले शिक्षण विभाग व जिल्हा परिषद लातुर यांच्या कडुन कांहीच हालचाल होताना दिसत नाही. शाळेत क्रिडा शिक्षक व सेवक नसल्याने पालक व शिक्षण प्रेमी नागरीक प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आहेत. आता तरी लवकरात लवकर क्रीडा शिक्षक व सेविकाची नियुक्ती करून विद्यार्थ्यांची शिक्षकाची होणारी गैरसोय दुर करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थ शिक्षणप्रेमी जनता करीत आहे.




























































