
सामना प्रतिनिधी । मालवण
खैदा कातवड शाळेत नियुक्त असलेल्या शिक्षकांना अन्य शाळेत का पाठवण्यात आले, असा जाब विचारत येत्या दोन दिवसात प्रसाद कदम या शिक्षकांची नियुक्ती खैदा-कातवड शाळेवर न झाल्यास ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मिळून शाळाबंद आंदोलन छेडतील, असा इशारा खैदा- कातवड ग्रामस्थांनी शिक्षण विभागाला दिला.
दरम्यान, खैदा- कातवड या प्रशालेच्या शिक्षकाचा प्रश्न दोन दिवसात सोडविला जाईल, असे आश्वासन सभापती, उपसभापती, विस्तार अधिकारी यांनी ग्रामस्थांना दिले.
मालवण खैदा-कातवड येथील प्रशालेत नियुक्ती नंतर कार्यरत असलेले शिक्षक प्रसाद कदम यांना खाजनवाडी शाळेवर अध्यापनासाठी पाठविण्यात आले. ग्रामस्थाची शिक्षक मिळावा अशी मागणी असताना आणि तशी नियुक्ती झाली असताना त्यांना अचानक का बदलण्यात आले. याबाबत ग्रामस्थांनी शिक्षण विभाग व मालवण सभापती यांनी भेट घेत विचारणा केली. यावेळी कोळंब तंटामुक्ती समिती अध्यक्ष विजय नेमळेकर, महेश शीरपुटे, कोळंब ग्रा.प.सदस्य संजय कांबळी, कोळंब यशवंत चव्हाण, मोहन आचरेकर, सचिन कांबळी, मंगेश धुरी, दीपक कोरगावकर, आनंद धुरी, संतोष मालप, गजा गावडे, ज्ञानदेव ढोलम, दीपक पवार, शशांक धुरी व खैदा- कातवड ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळेची पटसंख्या सोळा असून पहिली ते चौथी चे वर्ग शिकवले जातात. शिक्षका अभावी प्रशालेतील मुले अभ्यासात मागे राहणार आहेत. परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्यात खैदा- कातवड शाळेतील मुले शिक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रात मागे राहणार आहेत. या प्रशालेला कायमस्वरूपी शिक्षक देणे शिक्षण विभागाला शक्य नव्हते हे जर जून महिन्या पूर्वी सांगितले असेत तर आम्ही आपल्या मुलांना दुसऱ्या शाळा मध्ये पाठविले असते. मात्र आता त्याचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे नियुक्त असलेल्या शिक्षकाचीच नियुक्ती व्हावी. अशी मागणी ग्रामस्थानी केली.






























































