मतदान यंत्रात बिघाड झाला तर नो टेन्शन; झोनल अधिकारी नवे मशीन घेऊन हजर होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान एखाद्या मतदान यंत्रात बिघाड झाला तर कोणतेही टेन्शन असणार नाही. तांत्रिक बिघाडानंतर आवघ्या दहा मिनिटांतच संबंधित विभागाचा झोनल अधिकारी नवे मशीन घेऊन मतदान केंद्रावर हजर होणार असल्यामुळे मतदारांची लटकंती थांबणार आहे.

देशभरात आता मतदानासाठी कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट  अशा तीन मशीनचा वापर केला जाणार आहे. तांत्रिक बिघाडामुळे या मशीन बंद पडल्यास निवडणूक कर्मचाऱ्याचा गोंधळ उडतो. तसेच मतदारांना रंगेत तिष्ठत उभे राहावे लागते. त्याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने कंबर कसली असून एखाद्या मतदान केंद्रावर मशीन बंद पडल्यास आवघ्या दहा मिनिटांत नवीन मशीन पोहचवण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी प्रत्येक 10 मतदान केंद्रांमागे एक झोनल अधिकारी असणार आहे. त्यानुसार एका लोकसभा मतदारसंघात गरजेनुसार सुमारे 250-300 झोनल अधिकारी असून त्यांच्याकडे कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट मशीन अतिरिक्त उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचे मोबाईल क्रमांक संबंधित निवडणूक कर्मचाऱ्याला उपलब्ध करून दिले आहेत. मशीनमध्ये बिघाड झाल्यास कर्मचाऱ्यानी गोंधळून न जाता किंवा कोणाच्याही दबावाखाली न येता झोनल अधिकाऱ्याला फोन करावा. तो पुढील दहा मिनिटांत नवीन मशीन उपलब्ध करून देईल, असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी देवेंद्र कटके यांनी सांगितले.

 कर्मचाऱ्याच्या डय़ुटीबाबत गुप्तता

निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याना सध्या प्रशिक्षण दिले जात आहे, पण त्यांना कोणत्या विधानसभा क्षेत्रात डय़ुटी लागणार याबाबत निवडणूक आयोगाने कमालीची गुप्तता पाळली आहे.  मुंबईत 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्राकरिता टीम तयार केल्या आहेत. पण त्यांना कोणत्या मतदान केंद्रावर जायचे आहे याची माहिती मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांना मतदानाचे सर्व साहित्य दिल्यानंतरच कळणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.