
सामना ऑनलाईन । इस्लामाबाद
पुलवामा येथील हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानातील 22 दहशतवादी तळांचे ठोस पुरावे दिले. मात्र पाकडय़ांनी नेहमीप्रमाणे हात वर केले आहेत. ‘तिथे’ दहशतवादी तळच नाहीत, असे पाकिस्तान सरकार बरळले आहे.
14 फेब्रुवारी रोजी जम्मू-कश्मीरात पुलवामा येथे भयंकर दहशतवादी हल्ला झाला. यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली असतानाही पाकचे पंतप्रधान इम्रान खान सरकारने हिंदुस्थानने दिलेले पुरावे फेटाळले आहेत. हिंदुस्थानने भक्कम पुरावे देताना पाकिस्तानात सुरू असलेल्या 22 दहशतवादी तळांची पूर्ण माहिती दिली. मात्र हे पुरावे फेटाळून लावताना पाकने दहशतवादी तळांबाबतच्या माहितीत तथ्य नसल्याचा दावा केला आहे. हिंदुस्थानने दिलेल्या 22 ठिकाणांची पडताळणी केली; पण तिथे कोणताही दहशतवादी तळच अस्तित्वात नाही, असे इम्रान सरकारचे म्हणणे आहे. ही माहिती पाकमधील हिंदुस्थानचे उच्चायुक्त यांनाही देण्यात आली आहे.
54 जणांची चौकशी, पण पुलवामा हल्ल्याशी संबंध नाही
पुलवामा हल्ल्याप्रकरणी 54 जणांची चौकशी सुरू आहे. पण या 54 जणांचा पुलवामा हल्ल्याशी कोणताही संबंध आढळून आला नाही, असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. हिंदुस्थानकडून दिलेल्या पुराव्याआधारे ही चौकशी सुरू आहे. दहशतवादी अदील दारने कबुली दिलेला व्हिडीओ, वॉट्सऍप मेसेजेस, फोन कॉल्स याची छाननी सुरू असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
























































