
नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनची थेट सेवा उद्या दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू होत आहे. मध्य रेल्वेने या नॅरो गेज मार्गावर सातत्याने डबे घसरण्याच्या घटनांपासून धडा घेत डेमू मिनी ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी चेन्नई येथील आयसीएफ कारखान्याला स्पेशल डेमू ट्रेन तयार करण्याची विनंती करण्यात आली आहे.
गेली तीन वर्षे बंद असलेली नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनची सेवा दिवाळीच्या मुहूर्तावर उद्या शनिवार, 22 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे माथेरानच्या विकासाला चालना मिळणार आहे. ऑगस्ट 2019 रोजी झालेल्या अतिवृष्टीने 21 कि.मी.चा हा नॅरो गेज रेल्वेमार्ग तब्बल 20 ठिकाणी क्षतिग्रस्त झाला होता. या मार्गाची डागडुजी पूर्ण करण्यात आली असून 14 किलोमीटरचे ब्रिटिशकालीन लोखंडी स्लिपर्स काढून त्याजागी सिमेंटचे स्लिपर्स टाकण्यात आले असून तटबंदी तसेच अन्य कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
दार्जिलिंगच्या धर्तीचे कोच
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी माथेरानला भेट देऊन मिनी ट्रेनचे निरीक्षण केले तसेच येथे डेमू ट्रेन चालविण्याचा प्रयोग करण्यासाठी आयसीएफ कारखान्याला तशी ट्रेन तयार करण्यास विनंती केली. ही सेल्फ प्रोफेल डेमू मिनी ट्रेन चालविल्यास डबे घसरण्याच्या घटना कमी होतील असे म्हटले जात आहे. तसेच दार्जिलिंग हिमालयीन मिनी ट्रेनप्रमाणे गिअर व ट्रॉली असलेले डबे बांधण्यासही सांगण्यात आले आहे. तसेच माथेरान मार्गावर बर्थ डे सेलिब्रेशनसाठी सलून कोच भाडय़ाने देण्याची योजना असल्याचे सूत्रांनी सांगितले.































































