पीएनबी घोटाळा दडपण्यासाठी सीबीआय महानिरीक्षकाची नागपूरला बदली

 सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

अधिकाऱ्यांमधील वादामुळे सीबीआयची नाचक्की झालेली असतानाच आता अब्रूचे पुरते धिंडवडे काढणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. सीबीआयचे महानिरीक्षक मनीषकुमार सिन्हा यांनी थेट केंद्रातील मोदी सरकार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि केंद्रीय मंत्री हरिभाई चौधरींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

पीएनबी घोटाळा आणि नीरव मोदीची चौकशी दडपण्यासाठी केंद्र सरकारचा दबाव होता. एवढेच नव्हे तर अस्थाना प्रकरणातील दोन दलालांशी अजित डोभाल यांचे संबंध असून राकेश अस्थानांच्या चौकशीत त्यांनी ढवळाढवळ केल्याचा गौप्यस्फोटही सिन्हा यांनी केला आहे. यासाठीच आपली नागपूरला बदली करण्यात आल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे. सिन्हा एवढय़ावरच थांबलेले नाहीत तर केंद्रीय मंत्री हरिभाई चौधरी यांना याच प्रकरणात दोन कोटींची लाच देण्यात आल्याचा बॉम्बगोळाही त्यांनी टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मनीषकुमार सिन्हा यांनी आपल्या बदलीच्या निर्णयाला आज सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. राकेश अस्थाना यांच्यावर करण्यात आलेल्या लाचखोरीच्या आरोपाची चौकशी करणाऱ्या पथकाचे सिन्हा हे प्रमुख होते. रातोरात या पथकातील सर्व अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. सिन्हा यांनाही नागपूरला पाठवण्यात आले. या बदलीच्या विरोधात सिन्हा यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर आव्हान दिले. आलोक  वर्मा यांच्या याचिकेसोबतच आपल्या याचिकेवर सुनावणी करावी अशी विनंती त्यांनी केली, मात्र खंडपीठाने ही मागणी फेटाळून लावली.

अजित डोभाल यांनी दबाव आणला

मनीषकुमार सिन्हा यांनी आपल्या याचिकेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावर थेट आरोप केला आहे. राकेश अस्थाना यांची चौकशी सुरू असताना अजित डोभाल यांनी अनेक वेळा फोन केला. अस्थाना यांच्या घरावर धाड टाकू नये यासाठी डोभाल यांनी प्रचंड दबाव आणला असा आरोपही सिन्हा यांनी केला आहे. अस्थाना प्रकरणातील  दोन दलालांशी डोभाल यांचे संबंध आहेत. या संदर्भात ‘रॉ’चे अधिकारी सामंत गोयल यांचे फोन रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

‘अस्थानाची चौकशी करणाऱ्या सीबीआयच्या पथकाला मॅनेज करण्यात आले आहे’ असे गोयल म्हणाले होते आणि त्याच दिवशी रात्री या पथकातील एकूणएक अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. अस्थाना प्रकरणातील आणखी एक दलाल मनोज प्रसाद, त्याचे वडील दिनेश्वर प्रसाद व निवृत्त अतिरिक्त सचिव सोमेश यांचे अजित डोभाल यांच्याशी जवळचे संबंध आहेत. केंद्रीय मंत्री हरिभाई चौधरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तुळातले असून त्यांनी आपल्या पदाचा वापर करून चौकशीत दबाव आणला असा आरोप मनीषकुमार सिन्हा यांनी याचिकेत केला आहे. दलाल सना सतीशबाबू यानेही हरिभाई चौधरींना सीबीआय चौकशीत मदत करण्यासाठी कोटय़वधी रुपये देण्यात आल्याचा उल्लेख केल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे. अहमदाबादेत विपुलच्या माध्यमातून हे पैसे देण्यात आले.

 

आपली प्रतिक्रिया द्या