
देशातील एमबीबीएसच्या एका जागेसाठी 20 विद्यार्थी रांगेत असल्याचे चित्र यंदा आहे. 2014 मध्ये हे प्रमाण एका जागेमागे 11 विद्यार्थी एवढे होते. एमबीबीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट-यूजी रविवारी पार पडली. यावर्षी नीट-यूजीसाठी अर्जदारांची संख्या 16 टक्क्यांनी वाढली आहे. वर्ष 2021 मध्ये 16 लाख 14 हजार 777 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा ही संख्या तब्बल 18 लाख 72 हजार 341 वर पोहोचली आहे.
हिंदुस्थानातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 2014 मध्ये 387 वरून आता 596 वर गेली आहे. एमबीबीएस उमेदवारांची संख्या 2014 मध्ये 5 लाख 79 हजार 604 वरून 2022 मध्ये 18 लाख 72 हजार 339 वर पोहोचली आहे. एमबीबीएसच्या जागांमध्येही यंदा 72 टक्क्यांची वाढ झाली असून एमबीबीएसच्या 89 हजार 875 जागा उपलब्ध आहेत.
युक्रेनमधून परतलेल्या 6 हजार विद्यार्थ्यांनी दिली नीट
रशियासोबतच्या युद्धामुळे युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून मायदेशी हिंदुस्थानात परतेलेल्या 18 हजार विद्यार्थ्यांपैकी एक तृतीयांश म्हणजेच सुमारे 6 हजार विद्यार्थ्यांनी रविवारी नीट-यूजी परीक्षा दिली. हे विद्यार्थी युक्रेनमधील विद्यापीठात एमबीबीएसच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात शिकत होते. या विद्यार्थ्यांनी हिंदुस्थानात एमबीबीएसला प्रवेश मिळावा म्हणून नीट-यूजीसाठी नोंदणी केली होती.
युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांनी याआधीही नीट-यूजी पार केली होती, परंतु हिंदुस्थानातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस प्रवेश घेण्याइतके रँक त्यांना मिळविता आले नाही. तसेच येथील खासगी महाविद्यालयात प्रवेश घेण्याइतकी आर्थिक परिस्थिती नसल्याने विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षणाला पसंती दर्शविली होती.
























































