स्मृतिगंध – कर्मयोगी आणि अभ्यासक

372

>> प्रशांत गौतम

विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, कथालेखक, प्रभावी व्याख्याते, संत साहित्याचे अभ्यासक प्रा. वसंत कुंभोजकर यांचे नुकतेच निधन झाले. प्रत्येक प्रश्नाची दुसरी बाजू उमजून ती निर्धाराने मांडणारे अशी ओळख असणाऱया कुंभोजकर यांचे सर्वच क्षेत्रात अतुल्य योगदान आहे. 

गुणवंत, प्रतिभावंत विद्यार्थ्यांना घडविणारे गुरू अशी ओळख असणारे प्रा. वसंत कुंभोजकर वयाच्या 94 व्या वर्षी चिरंतनाच्या प्रवासाला गेले. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, मराठीतील अव्वल दर्जाचे कथालेखक, प्रभावी व्याख्याते, संतसाहित्याचे अभ्यासक, रचनात्मक कार्यात आपल्या कार्यकर्तृत्वाची नाममुद्रा उमटवणारे कुंभोजकर गुरुजी उत्तम लोकसंग्राहक होते. साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत त्यांनी दिलेले योगदान सर्वश्रुत आहे. 8 मार्च 1928 रोजी सांगली येथे जन्म झालेल्या वसंतरावांच्या कारकीर्दीची सुरुवात शिक्षकी पेशापासून झाली. शिक्षणाधिकारी, प्राध्यापक म्हणून सांगली, अमरावती, कोल्हापूर येथे सेवा करून ते नोकरीनिमित्ताने संभाजीनगर शहरात स्थायिक झाले होते. शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयातून 1986 साली ते सेवानिवृत्त झाले. नोकरीतून सेवानिवृत्त झाले असले तरी सार्वजनिक क्षेत्रात मात्र ते कार्यरत होते. विद्याभारती या अखिल भारतीय शिक्षण संस्थेच्या विद्या प्रतिष्ठानचे ते संभाजीनगर जिल्हय़ाचे उपाध्यक्ष म्हणून शेवटपर्यंत कार्यरत होते. विविध वाङ्मयीन विषयांवर ते केवळ व्याख्यानेच देत नसत, तर सार्वजनिक कार्यात रचनात्मक कार्य करून जुन्या, नव्या पिढीलाही सोबत घेऊन कार्य करणारे ते कर्मयोगी होते. त्यांच्या कार्यास खरा बहर आला तो सेवानिवृत्तीनंतर. सेवानिवृत्तीनंतर त्यांना त्यांच्या आवडीच्या कामासाठी भरपूर वेळ मिळाला. उत्तम गुणी, हुशार विद्यार्थी शोधणे, त्यांच्या अंगभूत कलागुणांना पैलू पाडणे, त्यांच्या मनावर, बुद्धीवर सुसंस्कार घडविणे, त्याला अथक परिश्रमांची जोड लावणे हे शिक्षण क्षेत्रातले आपले ‘धर्मकार्य’ आहे या निष्ठेने त्यांनी आयुष्यभर काम केले. सांगली, गडहिंग्लज, तासगाव, बुधगाव ही पश्चिम महाराष्ट्रामधील गावे असोत, तिथल्या शाळा असोत नाहीतर अमरावती, कोल्हापूर, संभाजीनगर यासारखी शहरे असोत किंवा तेथील शाळा, महाविद्यालये असोत, ते जेथे जातील तेथे त्यांची पारखी नजर गुणवंत, प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सातत्याने शोध घेत असे. त्यांना हेरत, त्यांना निवडत अस़े  त्यांच्या कल्याणाकरिता, उत्कर्षाकरिता जे जे काही चांगले करता येईल ते कुंभोजकर सर सातत्याने करीत असत. त्यांनी स्वेच्छेने स्वीकारलेले हे क्रत होते. केवळ साहित्य, कला, संस्कृती हेच कार्यक्षेत्र न ठेवता शिक्षणाच्या माध्यमातून जे उत्तम करता येईल ते त्यांनी केले. वर्गात ते त्यांचा विषय रसाळपणे शिकवत असत. मराठीतून उत्तम संवाद कसा करावा याचे ते उत्तम मार्गदर्शन करीत असत. त्यांची विद्यार्थीप्रियता एवढी की, त्यांच्या मराठीच्या तासाला विज्ञान, वाणिज्य शाखेचे विद्यार्थीही येऊन बसत. कुंभोजकर हे तीन पिढय़ांवर संस्कार करणारे शिक्षक होते. असा हाडाचा शिक्षक आता होणे नाही. त्यांनी आपले आयुष्य तर समृद्ध केले, पण त्यांच्या सान्निध्यात येणाऱया मित्र, स्नेही आणि विद्यार्थ्यांचेही जीवन संपन्न केले. ‘सत्यकथा’, ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’ यात त्यांच्या कथा प्रसिद्ध होत असत़  ‘रसिक’, ‘धूपदान’, ‘रुसवा’, ‘हिरवळ’ हे कथासंग्रह, ‘वाताहत’, ‘डोळे उघडले’ या दोन कादंबऱया, ‘असाही एक औरंगजेब’, ‘नाटक’, ‘पोपटाचा डोळा’, ‘सकळ सुखाचा एकच मेळ’ अशी साहित्य संपदा त्यांच्या नावावर आहे. आपल्या सुवाच्य आणि वळणदार अक्षराप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांचेही अक्षर तसेच असावे हा त्यांचा कटाक्ष असायचा. ते महाविद्यालयात असल्याच्या काळात त्यांनी या गुणविशेषावर हस्तलिखित भित्तिपत्रकाची चळवळ चालवली होती. प्रा. वसंत कुंभोजकर यांच्या साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक कार्याच्या प्रवासात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रा. द. मा. मिरासदार, महंत नागराज बाबा, वि. वि. चिपळूणकर, मुकुंदराव किर्लेस्कर, माजी खासदार मोरेश्वर सावे, कवी श्री. दि. इनामदार, अशोक परांजपे, निर्मल दादा, प्राचार्य म. द. हातकणंगलेकर, कर्नल पी. एन. मोडक यांच्यासारखे विविध क्षेत्रांतील मान्यवर आले. या सर्वांनी, त्यांच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी कुंभोजकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित झालेल्या ‘वसंत सौरभ’ या गौरवांकात विस्ताराने लिहून त्यांच्या कार्यप्रवासाचा आढावा घेऊन त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. 2002 साली अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हा गौरवग्रंथ प्रकाशित झाला. कुंभोजकर सरांच्या बैठकीत मुलांसाठी जसे वर्गशाळा भरत असे तसेच दररोज भागवत, गीता, दासबोध यावर त्यांचे निरुपणही होत अस़े याचा लाभ त्यांच्याकडे येणाऱया जिज्ञासू वक्त्यांना हमखास होत असे.

कुंभोजकर हे प्रख्यात लेखक प्रा. द. मा. मिरासदार यांचे प्रदीर्घ काळापासूनचे स्नेही, मित्र आपल्या जिवलग मित्राच्या संदर्भात ते म्हणत असत – ‘‘केवळ पाटय़ा टाकणारे शिक्षक असा त्यांचा लौकिक कधीच ऐकायला मिळाला नाही. संघाचा संस्कार झाला म्हणून म्हणा किंवा त्यांच्या स्वभावाचा भाग म्हणा, वसंतरावांची वैचारिक निष्ठाही अविचल आहे. कुठल्याही व्यावहारिक मोहामुळे ते आपल्या निष्ठेपासून दूर गेले असे कधीच घडले नाही.’’ ‘एक आतिथ्यशील कार्यमग्न’ असेच वर्णन  वसंतरावांचे करतात. कुंभोजकर यांच्या निधनाने व्यासंगी प्राध्यापक, अभ्यासू वक्ता, रचनात्मक कार्य करणारा कर्मयोगी आपल्यातून निघून गेला आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या