ठसा : प्रमोद अष्टपुत्रे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी विज्ञान परिषदेचे हितचिंतक प्रमोद अष्टपुत्रे यांचे अलीकडेच निधन झाले. ते नुकतेच शासकीय सेवेतून निवृत्त झाले होते. 2008 मध्ये आनंदवन, वरोरा (जि. चंद्रपूर) येथे झालेल्या अ. भा. मराठी विज्ञान अधिवेशनात ते सहभागी झाले होते. आनंदवन येथील अधिवेशनाच्या निमित्ताने मराठी विज्ञान परिषदेच्या संपर्कात आलेले अष्टपुत्रे पुढे परिषदेशी जोडले गेले ते शेवटपर्यंत. कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या ठिकाणी मराठी विज्ञान परिषदेच्या उपक्रमांचा, खासकरून परिषदेच्या पत्रिका मासिकाचा प्रसार केला, तसेच सभासद मिळवून देण्यातही परिषदेला हातभार लावला. पत्रिकेची वार्षिक तसेच त्रैवार्षिक वर्गणी जमा करून ते परिषदेच्या खात्यात जमा करत, त्याचप्रमाणे तशी सूचना दूरध्वनी किंवा ई-मेलने परिषदेच्या कार्यालयाला देत असत. एवढे करूनही त्यांची जबाबदारी संपत नसे. सभासदांना अंक नियमितपणे अंक मिळतात किंवा नाही याचा पाठपुरावा करीत असत. अंक मिळत नसल्यास संबंधित सभासदाला अंक मिळत नसल्याचे परिषदेला कळवीत असत. क्वचितप्रसंगी पत्रिकेच्या दिवाळी अंकाला पान प्रायोजकही त्यांनी मिळवून दिले होते. हे करत असताना ते वैयक्तिकरीत्या परिषदेला देणगी देत असत. वयाच्या सत्तरीतही त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. संदीप सावंत (‘श्वास’ चित्रपट फेम) यांनी काही वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेल्या  ‘नदी वाहते’ चित्रपटाचा प्रसार व्हावा या हेतूने जून 2018 मध्ये मराठी साहित्य व संस्कृती कला मंडळ, वाशी येथे हा चित्रपट दाखवण्यात आला होता. या कार्यक्रमाकरिता निधी उभारणीसाठीही त्यांनी प्रयत्न केले होते. असाच कार्यक्रम अंबरनाथ, बदलापूर या ठिकाणी आयोजित करण्याचा त्यांचा मानस होता. अष्टपुत्रे यांच्या निधनाने मराठी विज्ञान परिषद एका सच्चा कार्यकर्त्याला मुकली आहे.