ऑक्टोबर हिटचा तडाखा आणखी वाढणार; थंडीची अजून प्रतीक्षाच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदा मॉन्सूनने लहरीपणा दाखवत उशीरा आगमन केले. तसेच ऑगस्टचा पूर्ण महिना ओढ दिली. त्यामुळे यंदा पाऊसमान कमीच आहे. तसेच याचा शेतीला सर्वाधिक फटका बसला आहे. आता देशातील अनेक राज्यातून मॉन्सूनने काढता पाय घेतला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात ऑक्टोबर हिट जाणवत आहे. आणखी तीन- चार आठवडे अशीच परिस्थिती राहणार असून ऑक्टोबर हिटचा तडाखा आणखी वाढणार आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना यंदा थंडीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मान्सूनने देशभरातून काढता पाय घेतला असताना तापमानात मात्र वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे आता ऑक्टोबर हिटच्या झळा मोठ्या प्रमाणाच जाणवत आहेत. येत्या काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने हिवाळा नेमका कधी सुरू होणार, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. जागतिक तापमानवाढीमुळे ऋतुचक्रातही बदल झाले आहेत. त्यामुळे अजून तीन आठवडे तरी ऑक्टोबर हिटचा तडाखा सहन करावा लागेल, त्यानंतर थंडीची चाहूल लागेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

ऑक्टोबर हिटमुळे तापमानात वाढ होण्यासोबतच आर्द्रतेची पातळीही वाढली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उकाडा असह्य होत आहे. या झळा उन्हाळ्याइतक्याच असह्य असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामानात झालेल्या या बदलामुळे हवामान खात्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.