
आयकर विभागाने ओडिशा आणि झारखंडमधील बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसह मद्य निर्मिती आणि विक्री करणाऱया विविध कंपन्यांवर केलेल्या छापेमारीत तब्बल 150 कोटींहून अधिक नोटांची माया जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. रोकड इतक्या प्रचंड प्रमाणावर होती की, 50 कोटी रुपयांची रोकड मोजून पूर्ण झाल्यानंतर मशीनही बंद पडले. त्यामुळे कारवाईला आणखी वेळ लागत होता. कंपन्यांनी करचोरी केल्याचा अधिकाऱयांना संशय होता.
आयकर विभागाने ओडिशातील बोलंगीर, संबलपूर आणि झारखंडमधील रांची, लोहरदगा येथील बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडच्या मालमत्तांवर कारवाई केली. मंगळवारी आयकर विभागाने सुरू केलेली कारवाई आज गुरुवारी तिसऱया दिवशीही सुरूच होती. कारवाईत कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी आयकर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱयांसह सीआरपीएफचे जवानही कारवाईच्या ठिकाणी उपस्थित होते.
ट्रक भरून स्टेट बँकेत आणली रोकड
रोकड जप्त केल्यानंतर मोठय़ा पिशव्या आणि पोत्यांमध्ये भरून भारतीय स्टेट बँकेच्या बोलांगीर शाखेत आणण्यात आली. सर्व रोकड कडक सुरक्षा व्यवस्थेत बँकेत जमा करण्यात आली. दरम्यान, ओडिशाच्या तितिलागढ येथील मद्यव्यापारी दीपक साहू आणि संजय साहू यांच्या घरीही छापेमारी करण्यात आली. दोघांवर कोटय़वधी रुपयांची करचोरी केल्याचा आरोप आहे.
– बौद्ध डिस्टिलरीजसह झारखंडचे प्रसिद्ध उद्योगपती आणि व्यापारी रामचंद्र रुंगटा यांच्या निवासस्थानांवरही छापेमारी करण्यात आली. गुरुवारी सकाळपासून रामगढ, रांची आणि इतर ठिकाणांसह रुंगटा यांच्या निवासस्थानावर आणि प्रतिष्ठानांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या.



























































