पिककर्ज वाटपास टाळाटाळ करणाऱ्या सहा बँकांविरुध्द पोलिसांत गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राकेश कुलकर्णी । धाराशिव

शासनाच्या वतीने वारंवार आदेशीत करुनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटपास टाळाटाळ करणाऱ्या जिल्ह्यातील सहा बँकांविरुध्द प्रशासनाच्या वतीने पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये कळंब व वाशी तालुक्यातील प्रत्येकी तीन बँकांचा समावेश आहे. शिवसेनेच्या वतीने पिककर्ज वाटपास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाईच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते.

जिल्ह्यातील बँक या शेतकऱ्यास पिक कर्ज वाटपास टाळाटाळ करीत आहेत. या संदर्भात शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांना पिक कर्ज न देणाऱ्या बँकांविरुध्द कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी काल मंगळवार दिनांक २६ जून रोजी जिल्ह्यातील पिककर्ज वाटपाचा आढावा घेतला, तसेच पिककर्ज वाटपास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहकार विभागास दिले.

या आदेशानुसार ज्या बँकेच्या शाखेनी एक टक्क्यापेक्षा कमी पिककर्ज वाटप केले आहे, अशा शाखांवर ही कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये कळंब तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कळंब, अंदोरा, मंगरुळ या शाखांचा समावेश आहे. वाशी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पारगाव, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तेरखेडा या शाखांच्या विरोधात तालुका सहायक निबंधकांनी पोलिस ठाण्यामध्ये जाऊन फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगळवारी रात्री उशीरा पाच तर आज बुधवार, २७ जून रोजी सकाळी एका शाखेच्या विरोधात कलम १८८ नुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे संबंधित शाखांच्या शाखाधिकाऱ्यावर दाखल करण्यात आले आहेत.