
सामना प्रतिनिधी, सिंदेवाही
सिंदेवाही तालुक्यातील जवळच असलेल्या सावरगाटा या गावातील रहिवासी असलेल्या वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी मोहाची फुले वेचण्यासाठी जंगलामध्ये गेला असता वाघाने हल्ला केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, सावरगाटा येथील सरपंच यांचे वडील मृतक बाजीराव सोनुले (60 वर्षे राहणार सावरगाटा) हे आज सकाळी मोहाची फुले वेचण्या करता गावाच्या जवळच असलेल्या जंगलात गेले. तेव्हा तिथे दबा धरून असलेल्या वाघाने बाजीराव सोनुले यांना ठार मारले. ही घटना सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच एफडीसीएम वन परिक्षेत्र अधिकारी रोशन जंगीलवार व त्यांचे वन कर्मचारी तसेच सिंदेवाही पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले होते.


























































