
सामना प्रतिनिधी, बीड
भरधाव वेगात असणाऱ्या मोटारसायकलने ट्रॅक्टर ट्रालीस जोराची धडक दिल्याने झालेल्या गभिंर अपघातात मोठेवाडी येथील कचरु ज्योतीबा रेडे या वृद्धाचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना 20 मार्च रोजी रात्री नऊच्या दरम्यान घडली.
या अपघाताविषयी मिळालेली माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील कचरू ज्योतिबा रेडे (वय 60 वर्षे ) व दौलत सरकटे हे दोघेजण माजलगाव वरुन मोटार सायकल हिरो होंडा पॅशन प्रो क्रमांक एम.एच. 13 /एबी-1081 या गाडीवरून राष्ट्रीय महामार्ग-61 सी. वरून तालुक्यातील मोठेवाडी कडे जात होते. या दरम्यान खरात आडगाव फाट्याजवळ उभी असलेली ट्रक्टर ट्राली अंधारात दिसून न आल्याने मोटार सायकल ट्रालीवर जोराने धडकली. या अपघातात कचरु ज्योतीराम रेडे हे जागीच ठार झाले. तर मोटरसायकल वर सोबत असलेले दौलत सरकटे हे गंभीर जखमी झाले असून जखमीला पुढील उपचारार्थ बीड येथे पाठवण्यात आले आहे.
























































