
कश्मीर म्हणजे धरणीवरचा स्वर्गच. असं कश्मीर विविध कारणांनी चर्चेत राहतं. हिवाळा म्हणजे कश्मीरमधला बर्फ अनुभवण्याची अनोखी संधी मात्र आता कश्मीरचं ते वैभव जणू हरवल्यासारखं झाल्याची भिती व्यक्त होत आहे.
हिमवर्षावासाठी प्रसिद्ध असलेलं जम्मू आणि कश्मीरमधील लोकप्रिय हिवाळी क्रीडा स्थळ गुलमर्गचे यंदाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. मात्र त्याचं कारण आहे ते यंदा इथे न झाली हिमवर्षा. यामुळे गुलमर्गमध्ये स्थानिकांना आणि पर्यटकांना बर्फाचा आनंदच लुटता येत नसल्याचं चित्र आहे.
आता नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी याबद्दल पोस्ट केले असून, ‘हिवाळ्यात गुलमर्ग इतके कोरडे कधीच पाहिले नव्हते’ असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या अधिकृत X वरील पोस्टमध्ये एकाच दिवशी घेतलेल्या मागील वर्षांतील दोन फोटो शेअर केल्या आहेत.
जर लवकरच बर्फ पडला नाही तर उन्हाळा ‘दयनीय’ असेल, असं अब्दुल्ला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
I’ve never seen Gulmarg so dry in the winter. To put this in to perspective here are a couple of photographs from previous years, both taken on the 6th of Jan. If we don’t get snow soon the summer is going to be miserable. Not to mention skiers like me who can’t wait to get on… https://t.co/6Bj2umfGJq pic.twitter.com/gkhMZ49XSf
— Omar Abdullah (@OmarAbdullah) January 9, 2024
‘हिवाळ्यात गुलमर्ग इतका कोरडा मी कधीच पाहिला नाही. याच दृष्टीकोनातून इथे 6 जानेवारीला काढलेली दोन छायाचित्रे आहेत. जर अजूनही हिमवर्षाव झाला नाही तर उन्हाळ्यातील स्थिती गंभीर असेल. माझ्यासारख्या स्कीयर अशा हिमाच्छादीत शिखरांवर स्कीइंग करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. परंतु यंदा इथे स्कीइंग करण्यासारखे काहीच नाही’, असं त्यांनी पोस्ट मध्ये लिहिले आहे.
बर्फाच्छादित शिखरांसाठी ओळखले जाणारे गुलमर्ग हे देशभरातील पर्यटक आणि स्कीइंग करणाऱ्यांसाठी मोठे आकर्षणाचे ठिकाण आहे. या हंगामात क्वचितच हिम वर्षा झाली आहे. ज्यामुळे हिंदुस्थानच्या हिवाळ्यावर ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामाबद्दलची अभ्यासकांची चिंता वाढली आहे.
8 जानेवारी रोजी, एएनआय वृत्तसंस्थेने X वर एक व्हिडीओ पोस्ट केला ज्यामध्ये हे शहर ओसाड आणि कोरडे दिसत आहे. जमिनीवर बर्फाचे विरळ भाग दिसतात.
केवळ गुलमर्गच नाही तर कश्मीरच्या पहलगामसह हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या पर्वतीय राज्यांमध्येही सरासरीपेक्षा कमी बर्फवृष्टी झाली.

























































