
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केले. मात्र याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केंद्रापर्यंत पायी पोहोचत आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी एका व्हिडीओ निवेदनात म्हटले आहे की निवडणूक आयोगाने (ECI) विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपकडून (BJP) वारंवार आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल मौन बाळगले आहे.
‘निवडणूक आयोग ज्या प्रकारे गप्प बसले आहे ते पाहता लोकशाहीसाठी हा वेक अप कॉल आहे’, असे खेरा म्हणाले. काँग्रेस पक्ष पंतप्रधान मोदींच्या ‘रोड शो’ ला जाहिरातीच्या व्याख्येखाली आणण्यासाठी कायदेशीर पैलूंवर विचार करत आहे.
‘अहमदाबादमध्ये मतदान करण्यासाठी गेलेल्या पंतप्रधानांचे अडीच तास सर्व वृत्तवाहिन्यांनी थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. तुम्ही भाजपवर शुल्क आकारत नाही का? तुम्ही हे फुकट का करत आहात? निवडणूक सुरू असतानाही ‘रोड शो’ Live चालवण्यास भाग पाडणाऱ्या पक्षाच्या निवडणूक खर्चाच्या कक्षेत अशी प्रसिद्धी येईल याची खात्री करण्यासाठी शक्य तितक्या कायदेशीर मार्गांनी प्रयत्न करू, आवश्यक ती पावले उचलू’, असेही खेरा पुढे म्हणाले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान आणि इतर भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या की ते ‘व्हीव्हीआयपी’ आहेत आणि दडपशाहीने ‘काहीही करू शकतात’.
‘मतदानाच्या दिवशी रोड शोला परवानगी नाही, पण पंतप्रधान मोदी आणि त्यांचा पक्ष व्हीव्हीआयपी आहेत, ते काहीही करू शकतात आणि त्यांना माफ केले जाईल’, असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावल्याचे एएनआयने म्हटले आहे.
हा रोड शो नव्हता असे सांगून भाजपचे प्रवक्ते म्हणाले, ‘पंतप्रधानांचा ताफा मतदान केंद्रापासून थोडे पुढे उभा होता आणि पंतप्रधान मतदान करण्यासाठी ते मतदान केंद्रापर्यंत चालत गेले. हा रोड शो किंवा कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम नाही. एक नागरिक म्हणून तुम्ही काय कराल? तुम्ही तुमच्या वाहनाने मतदान केंद्राच्या आत तर जाणार नाही ना?’
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अहमदाबादमधील मतदान केंद्रावर मतदान केले. अहमदाबाद शहरातील राणीप भागातील निशान हायस्कूल येथील मतदान केंद्रावर सकाळी 9.30 वाजता मतदानासाठी पोहोचले. पंतप्रधान मतदान केंद्रातून बाहेर पडले आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी जमलेल्या गर्दीला शाई लावलेले बोट दाखवले. त्यानंतर ते मतदान केंद्राजवळील त्यांचा मोठा भाऊ सोमा मोदी यांच्या घरी चालत गेले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुखराम रथवा यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला.
























































