भरधाव कारची टँकरला मागून धडक; एक तरुण ठार,चौघे जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

भरधाव कार रस्त्याच्या कडेला उभ्या टँकरला मागून धडकल्याने त्यात एका तरुणाचा मृत्यू तर अन्य चार तरुण जखमी झाल्याची घटना आज दुपारी वांद्रे रिक्लेमेशन येथे घडली. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बोरिवली येथे राहणारे पाच तरुण ह्युंदाई वरना या कारने दक्षिण मुंबईत आले होते. तेथून ते घराकडे परतत असताना वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोलनाका सोडल्यानंतर ते सुसाट निघाले. दरम्यान, रिक्लेमेशन येथे रस्त्याच्या कडेला एक टँकर उभा होता. वेगात असलेली कार टँकरला मागून जोरात जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात हमजा जुगर इंदोरवाला (22) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर आरिफ मेहता (19), विरल चव्हाण (19), मुर्तूझा भान खुरावाला (19), गौरव जैन (18) हे चौघे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वांद्रे वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी तरुणांना स्थानिकांच्या मदतीने भाभा रुग्णालयात नेले. कार चालक आरिफ मेहता याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस अधिक तपास करीत आहेत.