
सामना ऑनलाईन । मुंबई
केंद्र सरकारमध्ये अधिकारी असून माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगली ओळख आहे. त्याआधारे तुम्हाला स्वस्तात प्लॅटस् तसेच बंगला, पोलीस दलात नोकरी मिळवून देतो अशी बतावणी करीत नागरिकांना फसविणाऱ्या एका भामटय़ाला पायधुनी पोलिसांनी अटक केली आहे.
राजा मंडल (55) असे आरोपीचे नाव आहे. डोंगरी येथे राहणारा मंडल स्वतःला केंद्र सरकारी अधिकारी असल्याचे सांगायचा. त्याने एका खासगी बँकेत काम करणारे प्रकाश थोरात, गुरव मोरे आणि मनोज देसाई या तिघांना चुना लावला होता. जून महिन्यात हे तिघे मंडलला त्याच्या डोंगरी येथील घरी भेटले होते. तेव्हा रे रोड येथील म्हाडा इमारतीत तुम्हाला स्वस्तात घर मिळवून देतो. माझी मोठमोठय़ा अधिकाऱ्यांशी ओळख आहे असे सांगून मंडलने तिघांवर छाप पाडली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत प्रत्येकाने सहा लाखांची रोकड मंडलला दिली. शिवाय रियाज शेख याला बंगला व पोलीस खात्यात नोकरी मिळवून देतो असे सांगत त्याच्याकडून एक लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर मंडल सर्वांना टाळू लागला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे कळताच चौघांनी पायधुनी पोलिसांत धाव घेऊन मंडलविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू करून नागरिकांना वेगवेगळी आमिषे दाखवून फसवणाऱ्या राजा मंडलच्या मुसक्या आवळल्या. त्याने अशा प्रकारे किती लोकांना फसवले आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.



























































