खेडमधील 59 लाखाच्या दरोड्याप्रकरणी आणखी एक आरोपीला अटक

दोन किलो सोन्याचे आमिष दाखवून 59 लाख रुपयांच्या लुटीप्रकरणी खेड पोलिसांनी आणखी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 9 झाली आहे. रोशन तुरे (25) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील मास्टरमाईंड मात्र अद्याप फरार असून खेड पोलीस त्याच्या मागावर आहेत.

16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना महामार्गावरील उधळे गावानजीकच्या जंगलात घडली होती. वेरळ वासेवाडी येथे राहणाऱ्या अमर जड्याळ आणि अन्य तिघांना मुख्य आरोपी किशोर पवार याने 60 लाखांमध्ये दोन किलो सोन्याचा व्यवहार करण्यासाठी उधळे येथील जंगलमय भागात नेले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत 59 लाख 6 हजार रुपयांची रोकड होती. घटनास्थळी पोहचल्यावर त्या ठिकाणी आणखी काहीजण दुचाकी घेऊन आले. किशोर पवार आणि अमर जड्याळ यांच्यामध्ये सोने खरेदीबाबत बोलणी सुरु असतानाच किशोर पवार व दुचाकीवर आलेल्या अन्य आरोपींनी सोने खरेदी करण्यासाठी आलेला अमर जड्याळ व त्याच्या साथीदारांवर अचानक हल्ला करत त्यांचे मोबाईल फेकून दिले. नेमकं काय घडतंय हे कळायच्या आत त्यांच्या गळ्याला चाकू लावला आणि सोने खरेदीसाठी आणलेली 59 लाख 6 हजार रुपयांची रोकड घेऊन किशोर पवार व त्याचे साथीदार फरार झाले.

या दरोड्याबाबतची तक्रार दाखल होताच विक्रात चव्हाण आणि आणि सिद्धेश पवार या दोघांना पोलिसांनी त्याच दिवशी दस्तुरी आणि सुकवली येथून ताब्यात घेतले, तर पुढील तीन दिवसात आणखी सहा आरोपींना पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील जंगलातून ताब्यात घेतले.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना या प्रकरणातील आणखी एक आरोपी दापोली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या नुसार पोलिसांनी सापळा रचून रोशन तुरे (25) याला दापोलीतून ताब्यात घेतले. रोशन याच्या मुसक्या आवळल्याने या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 9 झाली आहे.

या प्रकरणाचा मास्टर माइंड किशोर पवार हा अद्याप फरार असला तरी तो लवकरच पोलिसांच्या ताब्यात असेल असा विश्वास खेड पोलीस स्थानकाच्या पोलीस निरिक्षक सुवर्णा पत्की यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या