कोऱ्हाळे येथील तरुणाच्या खूनप्रकरणी एकाला अटक; शिर्डी पोलिसांची कामगिरी

914

शिर्डीतील नांदुर्खी पाटाचे कडेला आढळून आलेल्या तरुणाच्या खूनप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात शिर्डी पोलिसांना यश आले आहे. सोमनाथ चांगदेव गुंजाळ (वय 25, रा.रामपुरवाडी,ता.राहाता) असे शिर्डी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. खूनप्रकरणी कोणत्याही प्रकारचे धागेदोरे नसताना शिर्डी पोलिसांनी जलगदतीने तपासाची सूत्रे हलवत पाच दिवसात या प्रकरणाचा छडा लावला आहे.

नांदुर्खी येथील श्रीकृष्ण मंदिरालगत पाटाच्या कडेला 4 मार्च रोजी एक मृतदेह आढळला होता. याबाबत शिर्डी गावचे पोलीस पाटील सोमनाथ वाणी यांनी खबर दिल्याने पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची पाहणी केली. तो कोऱ्हाळे येथील सुनील अशोक मुर्तडक (वय 25) यांचा असल्याचे समजले. मृतदेहाच्या डोक्याला झालेल्या जखमा पाहता डोक्यात हत्याराने वार करुन गंभीर जखमी करुन त्याचा खुन केला असावा असा संशय आला. तपासासाठी वेगवेगळी पथके तयार करून संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते.त्यापैकी सोमनाथ चांगदेव गुंजाळ याच्यावर संशय बळावला. त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत गुन्ह्याशी संबंध नसल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. गुंजाळ हा कोऱ्हाळे येथील हॉटेल पालवी येथे मॅनेजर असुन 3 मार्च रोजी रात्रीचे वेळी दारु देण्याच्या कारणावरुन झालेल्या बाचाबाचीतून सोमनाथला राग आला. त्याने अशोकला नांदुर्खी पाटाजवळ आणून त्याच्या डोक्यात दगडाने घाव करत त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे प्रेत कालव्याच्या पाण्यात टाकले. याबाबत शिर्डी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या