घरफोडीतील आरोपीला मुद्देमालासह अटक; एलसीबीची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

घरफोडीतील आरोपीला मुद्देमालासह पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. नितीन सोपान पवार (वय 21,रा. पानेगाव,ता.नेवासा) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राहुरी तालुक्यातील वाळुंजपाई येथे 16 एप्रिल रोजी रात्री घराचा दरवाजा उघडून रोख रक्कम व मोबाईल असा 73 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार नामदेव कल्याण पवार यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिली होती.

या गुन्ह्याचा तपास सुरु असताना गुन्हा नितीन पवार याने केल्याची महिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. पोलिस पथकाने आरोपी पवारचा शोध घेऊन पानेगाव (ता.नेवासा) येथून त्याला ताब्यात घेतले. यावेळी पवार याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यातील चोरलेले 20 हजार रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे तीन मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपी पवार याला पुढील तपासासाठी राहुरी पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ सोन्याबापू नानेकर, पोहेकॉ बाळासाहेब मुळीक, मोहन गाजरे, मनोज गोसावी, पोना रविंद्र कर्डिले, राम माळी, संदीप चव्हाण, विशाल दळवी, रणजित जाधव, रवि सोनटक्के, मेघराज कोल्हे, जालिंदर माने, चालक सचिन कोळेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.