एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर चाकू हल्ला, माथेफिरूने गुप्तांगावर केले वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । इंदूर

एकतर्फी प्रेमातून एका विवाहितेवर निर्घृण चाकूहल्ला केल्याची घटना मध्य प्रदेश येथील इंदूर इथे घडली. निखील सोलंकी असं या माथेफिरू तरुणाचं नाव असून या हल्ल्यात सदर विवाहिता मृत्युमुखी पडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी निखीलला अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, इंदूर येथील लसूडिया येथे बुधवारी संध्याकाळी ही भयंकर घटना घडली. निखील हा काजल शाक्य(25) या विवाहित तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. तो तिला बऱ्याच काळापासून त्रास देत होता. म्हणून तिने कंटाळून आपलं घरही बदललं होतं. बुधवारी संध्याकाळी काजलचा नवरा घरात नाही हे पाहून निखील काजलच्या घरात घुसला. त्याने तिच्यासमोर स्वतःच्या प्रेमाची कबुली दिली आणि काजलकडूनही कबुली मागितली. पण, काजलने त्याला साफ नकार दिला. तिचा नकार ऐकून तो तिच्याशी भांडू लागला. भांडण सुरू असताना त्याने तिला गळा आवळत खाली पाडलं आणि तिला मारहाण करू लागला. मारहाण करत असतानाच त्याने अचानक चाकू बाहेर काढला आणि काजलवर सपासप वार केले. या हल्ल्यात तिचे हात-पाय, पोट आणि गुप्तांगाला गंभीर जखमा झाल्या.

काजलने हल्ल्यादरम्यान मदतीसाठी आरडाओरडा केला. तिचा आरडाओरडा ऐकून तिची शेजारीण धावत मदतीला आली. पण, निखीलने चाकूचा धाक दाखवत तिला तिथून जायला सांगितलं. शेजारणीने प्रसंगावधान राखत तिथून काढता पाय घेतला आणि पोलिसांना फोन केला. दरम्यान, निखील काजलच्या घरातून निघून गेला आणि त्यानंतर घरी पोहोचलेल्या काजलच्या सासूने तिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं. सासूने तिला त्वरित रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रक्तस्रावामुळे काजलचा मृत्यू झाला. या प्रकरणी निखीलला अटक झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.