उल्हासनगरात दुकानदाराची भन्नाट ऑफर, कपडे खरेदीवर एक किलो कांदे फ्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कपडय़ांच्या दुकानांमध्ये पॅन्टवर शर्ट फ्री, बाय टू गेट वन फ्री, साडय़ांच्या खरेदीवर 50 टक्के डिस्काऊंट, एक घ्या एक मोफत मिळवा अशा अनेक ऑफर्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ठेवल्या असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र उल्हासनगरमधील एका दुकानदाराने आपल्या कपड्याच्या दुकानात चक्क ऑफरमध्ये कांदा ठेवला आहे. एक हजार रुपयांचे कपडे खरेदी केल्यानंतर हा दुकानदार ग्राहकांना एक किलो कांदे देत आहे. त्याच्या या अनोख्या ऑफरमुळे दुकानात खरेदीसाठी महिलावर्गाची झुंबड उडाली आहे.

मान्सूनच्या सुरुवातीला पावसाने मारलेली दडी आणि नंतर परतीच्या पावसाने घातलेला धुमाकूळ यामुळे कांद्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. त्यामुळे कांदा विशेष चर्चेत आला असून अनेक ठिकाणी स्वस्त दरात कांदा विक्री केंद्रेही सुरू करण्यात आले आहेत. उल्हासनगरमध्ये मात्र शीतल हॅन्डलूम या कपडय़ाच्या दुकानातील एका अनोख्या ऑफरमुळे कांद्याची रंगतदार चर्चा शहरात सुरू झाली आहे. शिरू चौकात जयशंकर आईस्क्रीमच्या मागे असलेल्या या दुकानाचे मालक ललित शेकवानी हे असून त्यांच्या दुकानात ब्लँकेट, चादरी, उशीची कव्हर, पडदे, पाय पुसणी आदींची विक्री केली जाते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी आपल्या दुकानात एक आगळी वेगळी ऑफर लावली आहे. एक हजार रुपयांच्या खरेदीवर त्यांनी एक किलो कांदे मोफत देण्यास सुरुवात केली. या ऑफरला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काल पहिल्याच दिवशी त्यांनी 40 किलो तर आज 50 किलो कांद्याचे वाटप केले.

नवरीने नेले दहा किलो कांदे
सध्या लग्नसराई सुरू असल्यामुळे उल्हासनगरमधील सर्वच कपडय़ांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी आहे. त्यातच शीतल हन्डलूममध्ये लावण्यात आलेल्या या कांद्याच्या ऑफरमुळे तिथेही लग्नाच्या खरेदीत वाढ झाली आहे. काही दिवसांवर लग्न आलेल्या आरती चांदवानी या वधूने या दुकानात येऊन दहा हजार रुपयांची खरेदी केली आणि ऑफरचे दहा किलो कांदे मोफत नेले.