545 किलो कांदा विकून मिळाले फक्त 216 रुपये; शेतकऱ्याने कमाई मुख्यमंत्र्यांना पाठवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

कांद्याला घाऊक बाजारात 51 पैसे प्रति किलो इतका कवडीमोल भाव मिळत आहे. इतक्या कमी दरात तब्बल 545 किलो कांदा विकून एका शेतकऱयाच्या हातात फक्त 216 रुपये इतकी रक्कम पडली. ते पैसे मुख्यमंत्र्यांना पाठवून शेतकऱ्याने आपला निषेध नोंदवला. याआधी एका शेतकऱ्याने कांदा विकून जमा झालेले पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले होते, जेणेकरून या देशात शेतकऱ्याने पिकवलेल्या अन्नधान्याला मिळणारा कवडीमोल भाव आणि त्याची कमाई पाहून झोपलेल्या सरकारचे डोळे उघडतील.

नाशिक जिह्यातल्या येवला तालुक्यातील अंदरसूलचे शेतकरी चंद्रकांत भिका देशमुख यांनी 5 डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा लिलाव झाल्यानंतर कमवलेले 216 रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले. त्याची पावतीही देशमुख यांनी दाखवली. इतक्या कमी पैशांमध्ये मी माझे घर कसे चालवू, माझे कर्ज कसे फेडू, मुलांची शिक्षणे कशी करू असे अनेक सवाल देशमुख यांनी सरकारला विचारले आहेत.

माझ्या कांद्याचा दर्जा चांगला असूनही चांगला भाव मिळत नाही. एकीकडे आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत, त्यांच्या कर्जमाफीसाठी तत्पर आहोत असे म्हणणाऱ्या सरकारचे डोळे उघडावे म्हणून आणि निषेध म्हणून कांदा विकून मला मिळालेली रक्कम मी मुख्यमंत्र्यांना पाठवत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, देशभरातल्या 50 टक्के कांद्याचे उत्पादन एकटय़ा नाशिकमध्ये होते. असे असताना कांद्याला असा कवडीमोल भाव मिळत असेल तर इथल्या शेतकऱ्यांनी कांदा का पिकवायचा, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.