लग्नाची वरात ‘ऑनलाईन’ आली नवरीच्या दारात! जम्मूतील लग्नाची होतेय चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. अगदी शाळांपासून ते ऑफिसपर्यंत सारकाही घरबसल्याच सुरू आहे. परदेशात तर अगदी लग्नसोहळे ऑनलाइन पार पडले आहेत. नुकताच जम्मूमधील रियासी या जिह्यामध्येदेखील सध्या एका ऑनलाइन निकाहाची चर्चा रंगली आहे.

झाले असे की, निकाहच्या काही दिवस अगोदरच कोटला गावातील नवरा मुलगा मनीरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्याचा 8 एप्रिलला पनासा गावातील रझिया हिच्यासोबत निकाह होणार होता. ठरल्याप्रमाणे नवरीच्या घरातल्यांनी लग्नाची जोरदार तयारी केली, पण ऐनवेळी मनीरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याला होम क्वारंटाइन व्हावे लागले. त्यामुळे मनीर वरात घेऊन नवरीच्या घरी जाऊ शकत नव्हता.

नवरीच्या घरची मंडळी चिंतेत पडली. निकाह पुढे ढकलण्याची चर्चा सुरू झाली. याचदरम्यान फॉरेस्ट राइट ऍक्टचे चेअरमन लियाकत अली, माजी सरपंच बशीर अहमद आणि अन्य काही मोठय़ा व्यक्तींनी मुलगा आणि मुलीच्या घरच्यांसोबत बातचीत केली. यानंतर तारखेत कोणताही बदल न करता ऑनलाइन पद्धतीने निकाह होईल असे ठरवण्यात आले.

केवळ नवरदेवच नाही तर त्याचे आई-वडील, भाऊ-बहीण यांच्यासह जवळच्या व्यक्तीही वरातीत सहभागी होणार नाहीत, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. निकाहची वेळ आली तेव्हा व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून नवरदेवासोबत संपर्क केला गेला. ऑनलाइन पद्धतीने हे लग्न पार पडल्यानंतर वधूची पाठवणी तिच्या मावशीच्या घरी करण्यात आली.