
सामना प्रतिनिधी । पैठण
पैठण येथील ‘मिनी घाटी’ म्हणून ओळख असलेल्या सरकारी दवाखान्यात अद्ययावत शस्त्रक्रियागृह उभारण्यात आले आहे. ३० लाख रुपये खर्चून तयार झालेल्या या सर्वसुविधायुक्त ऑपरेशन थिएटरचा लवकरच लोकार्पण कार्यक्रम होणार आहे. मराठवाड्यातील तालुकास्तरावरचे हे पहिलेच ऑपरेशन थिएटर असल्याची माहिती सरकारी दवाखान्याच्या ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथकाचे सहयोगी प्राध्यापक डाँ. भारत चव्हाण यांनी दै. ‘सामना’शी बोलताना दिली.
संत ज्ञानेश्वर उद्यान मार्गावर असलेल्या ५ एकर परिसरातील या शासकीय रुग्णालयात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. गोरगरीब रुग्णांना सर्वोत्तम आरोग्य सुविधा देता यावी, रुग्णाला पुढील उपचारासाठी संभाजीनगरला वारंवार पाठवण्याची वेळ येऊ नये, पैठणलाच सर्व प्रकारची औषधी व उच्चप्रतीचे उपचार असावे, यासाठी सर्वसमावेशक अहवाल तयार करुन वरिष्ठांमार्फत मुंबई मंत्रालयाच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्त करण्यात आला. यातील अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या. निधीची तरतूद झाली. त्यामुळे नवनवीन कामे हाती घेण्यात आली आहेत.
दरम्यान, ३० लाखांपेक्षा अधिक निधी खर्च करुन भव्य व सुसज्ज असे शस्त्रक्रियागृह तयार करण्यात आले आहे. आता पैठण येथील रुग्णांना लहान मोठ्या शस्त्रक्रियेसाठी संभाजीनगर येथे जाण्याची गरज पडणार नाही, अशी माहिती रुग्णालयाचे प्रपाठक डॉ. भारत चव्हाण यांनी दिली. पैठणचे रुग्णालय हे संभाजीनगर वैद्यकीय महाविद्यालयाशी (घाटी रुग्णालय) संलग्न ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक ( तीस खाटी) रुग्णालय आहे. या रुग्णालयात कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी तसेच प्रशिक्षणार्थी डॉक्टर हे रुग्णांवर उपचार करतात. पैठण शहर व परिसरातील जवळपास ८ गावातील नागरिकांना या रुग्णालयात वैद्यकीय सेवा मिळते.
मागील १० वर्षांपासून रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहाची दुरवस्था झाली होती. शस्त्रक्रिया गृहात संसर्ग निर्माण करणारी अनुकूल परिस्थिती होती. यामुळे मोतीबिंदू शस्त्रक्रिया गेल्या ५ वर्षांपासून बंद आहेत. मात्र वरिष्ठांचा दबाव आणि राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी येथील डॉक्टर आहे त्या अवस्थेत नसबंदी सारख्या शस्त्रक्रिया करत असतात. याविषयी अनेक वेळा येथील स्थानिक नागरिकांनी याबाबत आवाज उठवला होता. शेवटी संभाजीनगर वैद्यकीय महाविद्यालय (घाटी रुग्णालय) यांनी दखल घेत पैठण रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे पैठण मिनी घाटी रुग्णालयात सुसज्ज शस्त्रक्रियागृह उभारण्यात आले आहे.
एन.ए.बी.एच. या संस्थेच्या नामांकनाप्रमाणे वैद्यकीय शिक्षण विभागात व ग्रामीण आरोग्य पथकात प्रथमच ३०४ ग्रेड स्टेनलेस स्टील मोड्यूलर ऑपरेशन थिएटर प्रस्थापित करण्यात आले आहे. २५०० स्क्वेअर फूट फ्लोअर व्हिटरीफाईड टाईल्स बांधकाम विभागाची तांत्रिक परवानगी घेऊन हे काम करण्यात आले आहे.
































































