झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली तरच पर्यावरणपूरक कार्यक्रमांना यश, अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात, मात्र नंतर त्या झाडांची काळजी घेतली जात नाही. भविष्यात अशा वेळी लावलेल्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली पाहिजे, तरच पर्यावरणपूरक कार्यक्रम यशस्वी होतील, असे मत अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी चिपळुणातील पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. चिपळूण नगरपरिषद, नाम फाउंडेशन व श्रमिक पत्रकार संघ चिपळूणतर्फे लवेकर बागेजवळ नुकताच शिवनदी किनारी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

यावेळी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त चिपळूण नगर परिषदेचे अभिनंदन केले. काही वेळा वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात, मात्र झाडांची काळजी घेतली जात नाही, तरी भविष्यात वृक्षारोपणाबरोबरच संगोपन होणे हे महत्त्वाचे आहे. या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी पुढील पिढीवर असणार आहे.

चिपळुणातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शिक्षकांना विनंती केली की, पहिली ते दहावीतील विद्यार्थी शाळेत 10 वर्षे असतात, तर महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी 3 ते 5 वर्षे महाविद्यालयात असतात. या सर्वांवर प्रत्येक झाडाच्या संगोपनाची जबाबदारी दिली पाहिजे. हीच भविष्यात उपलब्धी ठरेल. हा उपक्रम महाराष्ट्रभर राबवला गेला, तर एक मोठे पर्यावरणपूरक काम होईल, असे मत ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी यावेळी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी झाडांच्या संगोपनासाठी घरातून दोन पाण्याच्या बाटल्या आणायच्या आहेत. एक बाटली स्वतःसाठी तर दुसरी बाटली झाडांसाठी असे प्रेम वाटून घेतले तर पर्यावरणपूरक वाटचाल यशस्वी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे चिपळूणचे मोठे नुकसान झाले. यावेळी नाम फाउंडेशनने चिपळूण नगर परिषदेच्या सहकार्याने शिवनदीतील गाळ काढण्याचे काम केले. ला आहे. यावर्षी १३ जुलै रोजीच्या सुमारास भरती आहे. अशा वेळी सर्वांनी मिळून काम करणे महत्त्वाचे आहे. नाम फाउंडेशनचे काम नेमक्या प्रांतापुरतं नाही. ते संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. येथे पर्यावरणपूरक आनंद सोहळा साजरा करता आला, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच यावेळी चिपळुणात नुकसानग्रस्तांना नाम फाउंडेशनच्या माध्यमातून घरे बांधून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाला उद्योजक, कंपन्या यांनी सीएसआर मधून निधी उपलब्ध करून दिला. पर्यावरणपूरक कार्यक्रमांबरोबरच चिपळूण शहरात कचरा नियोजनासाठी नाशिकच्या धरतीवर नैसर्गिक खत प्रकल्प उभारणे आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नाम फाउंडेशनचे मल्हार दादा पाटेकर, समीर जानवलकर, चिपळूण बचाव समितीचे बापू काणे, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. प्रसाद शिंगटे, पत्रकार मकरंद भागवत संतोष सावर्डेकर, राजेंद्र शिंदे, समीर जाधव, महेंद्र कासेकर, सुशांत कांबळे, नागेश पाटील, निलेश डिंगणकर तसेच पोलीस व चिपळूण नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.