
राजापूरच्या बारसू–सोलगावमधील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी होणाऱया सर्वेक्षणाला विरोध करणाऱया स्थानिक ग्रामस्थांवर पोलिसांकडून अमानुष अत्याचार सुरू आहेत. गोळय़ा घातल्या तरी मागे हटणार नाही असे छातीठोकपणे सांगत ग्रामस्थांनी बारसूच्या सडय़ावर ठाण मांडले आहे. कुटुंबकबिल्यासह लोक सर्वेक्षणाला विरोध करत आहेत. पोलिसांचा लाठीमार, अटकांना न जुमानता हा जनक्षोभ वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनीही सरकारच्या या दंडुकेशाहीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सर्वेक्षण तत्काळ थांबवा, खारघरची पुनरावृत्ती होऊ देऊ नका, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ही दादागिरी तत्काळ थांबवा!
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही ट्विट करत बारसूमधील दादागिरी तत्काळ थांबवा असे म्हटले आहे. बारसूमधील रिफायनरीस्थळी स्थानिक नागरिक, महिला, मुले असे सर्वजण सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करत आहेत. आज पोलिसांनी त्यांच्यावर व वार्तांकन करणाऱया माध्यम प्रतिनिधींवर दडपशाही सुरू केली आहे. हे अत्यंत निषेधार्ह असून सरकारने ही दडपशाही आणि सर्वेक्षण तत्काळ थांबवावे, असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. सरकारच्या गलथानपणामुळे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळय़ात 14 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बारसू परिसरात मोठय़ा प्रमाणात नागरिक आंदोलन करत असताना त्यांच्यावर दडपशाही करून सरकारला शेतकऱयांचे बळी घ्यायचे आहेत का? असा सवालही थोरात यांनी केला आहे.
महाराष्ट्रात दिल्लीच्या हस्तकांची दादागिरी चालू देणार नाही
स्थानिक जनतेला विश्वासात न घेता बारसूत रिफायनरी प्रकल्प लादणे ही हुकूमशाही असून कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात दिल्लीच्या हस्तकांची दादागिरी चालू देणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. जनतेवर दंडेली कराल तर याद राखा, असेही ते म्हणाले. बारसूमध्ये सुरू असलेल्या पोलिसांच्या दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असून पोलीस बळावर कोणाचा विकास साधायचा आहे? बारसू रिफायनरी प्रकल्प पोलीस बळाचा वापर करून लादणाऱयांनी हा जोर वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबससारखे लाखो तरुणांना रोजगार देणारे प्रकल्प गुजरातच्या घशात घालताना का लावला नाही? असा खोचक सवालही पटोले यांनी केला. दिल्लीतील मोदी-शहांचे हस्तक असलेले राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताकडे लक्ष देत नाही. भारतीय जनता पक्ष जनतेच्या हितासाठी नसून शेतकरी, तरुण, महिला, कामगार व जनताविरोधी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
सर्वेक्षण स्थगित करा, मानवतेच्या दृष्टिकोनातून मार्ग काढा!
राजापुरातील बारसू रिफायनरीसाठी दंडुकेशाहीने होणारे सर्वेक्षण तत्काळ स्थगित करून मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी व मानवतेच्या दृष्टिकोनातून मार्ग काढावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका, असे त्यांनी म्हटले आहे. रिफायनरीविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून स्थानिक नागरिक आंदोलनावर ठाम आहेत. त्या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावले आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी, असे अजित पवार यांनी नमूद केले आहे.
“राष्ट्रवादीची भूमिका विकासाची आहे, पण ते करत असताना पर्यावरणाचा ऱहास होणार नाही, भावी पिढय़ांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्या लोकांची बाजू ऐकून घ्यावी. त्यात तथ्य असेल तर मार्ग काढावा. तथ्य नसेल तर समजावून सांगावे’’ असे अजित पवार म्हणाले.
स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प होऊ देणार नाही…
स्थानिकांचा विरोध असेल तर बारसू रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला आहे. कोणाची तरी सुपारी घेऊन जमिनी हडपण्याचा प्रयत्न झाला तर मुख्यमंत्र्यांना महागात पडेल असा इशाराही त्यांनी दिला. कोकणातील शेतकऱयांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील शेतकरी धावतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. बारसूच्या विरोधात एकवटलेल्या महिला-पुरुषांवर दडपशाहीचा वरवंटा फिरवून माती परीक्षण करण्याचा घाट पोलिसांनी का घातला आहे? पोलिसांना यामध्ये इतका रस का आहे? असा सवाल शेट्टी यांनी केला आहे.




























































