
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
देशभरात सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवांमुळे होत असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटना घडत असताना केंद्रीय गृहमंत्री केवळ थातूरमातूर निवेदन करत असल्याच्या निषेधार्थ आज विरोधी पक्षाने लोकसभेतून सभात्याग केला.
लोकसभेत प्रश्नोत्तरांच्या तासानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील मॉब लिंचिंगच्या घटनांवर निवेदन केले. सोशल मीडियावरून व्हायरल होणाऱ्या अफवांमुळे मोठय़ा प्रमाणावर अशा घटना होत असून त्याबाबत सरकार चिंतेत आहे. अशा घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलू. तसेच जिथे घटना घडली तिथल्या मुख्यमंत्र्यांशी मी बोलत असतो, असे निवेदन राजनाथ यांनी केले. मात्र या निवेदनात काहीही ठोस नसल्याचा आरोप करत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी लोकसभेत सभात्याग केला.
पप्पू यादवांनी लोकसभेत कागद भिरकावले
लोकसभेचे कामकाज आज सुरू होताच बिहारचे बंडखोर खासदार पप्पू यादव यांनी बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली. त्यांनी वेलमध्ये येऊन कागदाच्या चिठोऱया चारी दिशांना भिरकावल्या. पप्पू आक्रमकपणे सत्ताधारी पक्षाच्या आसनाकडे येत असल्याचे पाहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना आवरले आणि समजूत घातल्यामुळे पुढचा अनर्थ टळला.
जयंत सिन्हांच्या माफीनाम्यावरून गदारोळ
मॉब लिंचिंगच्या घटनेतील जामिनावर सुटलेल्या आरोपींचा सत्कार केल्याचे प्रकरण केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांची पाठ अजूनही सोडायला तयार नाही. आज प्रश्नोत्तरांच्या तासांत सिन्हा प्रश्नांची उत्तर द्यायला उठताच ‘मंत्रीजी, माफी मांगो’ अशा घोषणा देत विरोधक वेलमध्ये आले. त्यामुळे सभागृहात काही काळ गदारोळ निर्माण झाला, मात्र त्यानंतर सिन्हा यांच्या खात्याशी संबंधित प्रश्न संपल्याने सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पडले.
राज्यसभेत आता मराठी, कोंकणी बोलता येणार
राज्यसभेतील सदस्य आता मराठी, कोंकणीसह इतर २२ बोलीभाषांमध्ये बोलू शकणार आहेत. मराठीसह आसामी, बंगाली, मल्याळम, कन्नड, उडिया, पंजाबी, उर्दू या भाषांमध्ये पूर्वीही राज्यसभेत सदस्यांना बोलता येत असे. मात्र अनुवादकांच्या कमतरतेमुळे अनेकदा राज्यसभेतील खासदारांना मातृभाषेत बोलता येत नसल्यामुळे संकोच होत असे. आता मात्र ही अडचण दूर झाली आहे. पूर्वीच्या १७ भाषांच्या जोडीला आता नव्याने डोंगरी, कश्मिरी, कोंकणी, संथाली आणि सिंधी भाषांमध्येही राज्यसभेच्या सदस्यांना बोलता येणार आहे. दस्तुरखुद्द सभापती व्यंकय्या नायडू यांनी या संकल्पनेचा शुभारंभ मराठीसह दहा भाषांमध्ये भाष्य करून केला.




























































