असाध्य आजारावर विजय मिळवत त्याने कोल्हापूर ट्राएथलॉन स्पर्धा जिंकली; बिलिमोरियाची भरारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

असाध्य अशा डिस्टोनिया या शरीरातील स्नायूंना गोठवणाऱया भयानक आजारावर जिद्दीने मात करीत त्याने अनेक कठीण मॅरेथॉन धावण्याचा भीमपराक्रम केला आहे. नुकतीच त्याने कठीण अशी कोल्हापूर ट्राएथलॉन स्पर्धा जिंकत आपल्या दुर्दम्य जिद्दीचे दर्शन सर्वांना घडवले आहे. कोल्हापूरच्या या स्पर्धेत स्पर्धकाला 1.9 किमी पोहोणे, 90 किमी बाईक राईड आणि 21 किमी धावणे अशा तीन कठीण क्रीडा प्रकारांत भाग घेऊन ते पूर्ण करावे लागतात.हुफ्रिद  हाही स्पर्धा जिंकणारा पहिला हिंदुस्थानी विकलांग खेळाडू ठरला आहे. ही स्पर्धा म्हणजे आंतरराष्ट्रीय ट्राएथलॉनची चाचणीच मानली जाते.

हुफ्रिद  बिलिमोरियाची कहाणी ही केवळ विकलांगच नव्हे, तर अन्य सुदृढ ऍथलेट्ससाठीही प्रेरणादायी ठरणारी आहे. भीषण आजाराशी हसत हसत सामना करीत हुफ्रिदने गेल्या काही वर्षांत 17 मॅरेथॉन, 6 स्विमेथॉन आणि 4 ट्राएथलॉन स्पर्धा असीम जिद्दीने पूर्ण केल्या आहेत. मुंबईच्या सेंट मेरी हायस्कूलमधून शालेय शिक्षण घेणाऱया हुफ्रिदने इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मुंबई या देशातील नामांकित संस्थेतून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स प्रावीण्याने पूर्ण केला आहे. याशिवाय त्याने टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसमधून विकलांगांच्या उन्नतीसाठी समाजसेवा या विषयात प्रथम श्रेणीने एमए पदवी मिळवली आहे. याशिवाय फिटनेससाठी त्याने मिश्र मार्शल आर्टस्चेही प्रशिक्षण घेतले आहे.

काय आहे डिस्टोनिया हा विकार?

डिस्टोनिया म्हणजे स्नायूंना होणारा एक भयानक विकार आहे. या विकारात रुग्णाच्या शरीरातील स्नायू गोठतात. त्यामुळे त्याला शारीरिक हालचाली करण्यास मोठे कष्ट घ्यावे लागतात. या विकाराला इंग्रजीत अटेन्शन डेफिसिएन्सी हायपरऍक्टिव्ह डिसऑर्डर असे म्हणतात.या विकारात हालचाली न झाल्याने रुग्ण शरीराने स्थूल होतो. त्यामुळे त्याला हालचाली करणे अधिकच कठीण होते.

त्याच्या जिद्दीपुढे विकारानेही माघार घेतली

वयाच्या 16व्या वर्षी हुफ्रिदला डिस्टोनियाने गाठले. त्याचे शालेय शिक्षण या आजाराला तोंड देतच पूर्ण झाले, पण याही स्थितीत तो जिद्द हरला नाही. मी विकलांग नाही हे दाखवण्याचा विडा उचलत त्याने असाध्य ते साध्य करून दाखवले आहे. न्यूयॉर्क लिबर्टी रन, एअरटेल दिल्ली हाफ मॅरेथॉन, टाटा मुंबई हाफ मॅरेथॉन आणि कुंडलिका हाफ मॅरेथॉन अशा अवघड स्पर्धांत धावून आपण विकलांग नाही हे दाखवून दिले आहे. मुंबईकर आणि देशातील युवकांना प्रेरणादायी ठरावी अशी कामगिरी करणाऱया हुफ्रिदला आता दुबईतील ‘आयर्न मॅन 70.3’ या कठीण मानल्या जाणाऱया साहसी स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे.  हुफ्रिदला त्याची आई रुक्साना बिलिमोरिया यांची खंबीर साथ मिळत आहे. त्या स्वतः अंजुमन-ए-इस्लाम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या प्राचार्या आहेत. आपल्या या जिद्दी भावाला आता सर्व मुंबईकरांच्या शुभेच्छांची गरज आहे.