लोक तडफडताहेत तरी हिंदुस्थानातील ऑक्सिजन दुपटीने झाला निर्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. ऑक्सिजनचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला आहे. वेळेवर आणि पुरेसा प्राणवायू न मिळाल्याने रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. अशी गंभीर परिस्थिती असतानाही गेल्या वर्षीच्या तुलनेत देशातून ऑक्सिजनची निर्यात दुपटीने झाली. हे धक्कादायक आणि तितकेच संतापजनक सत्य सरकारी आकडेवारीतूनच उघड झाले आहे.

हिंदुस्थानला कोरोनाच्या दुसऱया लाटेने जोरदार तडाखा दिला आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. ऑक्सिजनचा इतका तुटवडा का निर्माण झाला यामागचे खरे कारण काहीही असले तरी देशातून जानेवारी 2020 पेक्षा यंदाच्या वर्षी ऑक्सिजन दुपटीने निर्यात करण्यात आला असे वृत्त एका इंग्रजी नियतकालिकाने दिले.

देशातील अनेक राज्ये ऑक्सिजनच्या तुटवडय़ाचा सामना करत असताना केंद्र सरकारकडून आलेली ही आकडेवारी गंभीर आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची मागणी वाढत असतानाही केंद्र सरकारने उद्योगांसाठी लागणारा ऑक्सिजन वैद्यकीय क्षेत्रासाठी वापरण्याचा निर्णय तातडीने न घेतल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला धारेवर धरले होते. 22 एप्रिलपासून ऑक्सिजनच्या औद्योगिक वापराला बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याबद्दल न्यायालयाने सरकारवर कडक ताशेरे ओढले होते. मानवी जीवनापेक्षा आर्थिक हित महत्त्वाचे नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.

ऑक्सिजनची निर्यात

  • आर्थिक वर्ष 2019-2020 – 4500 मेट्रीक टन
  • एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 – 9000 मेट्रीक टनपेक्षाही जास्त
  • जानेवारी 2020 या एका महिन्यात 352 मेट्रिक टन ऑक्सिजन देशातून निर्यात करण्यात आला होता. त्या तुलनेच जानेवारी 2021 या महिन्यात त्यापेक्षा 734 टक्के जास्त ऑक्सिजनची निर्यात झाली.
  • डिसेंबर 2019 मध्ये 538 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्यात केला गेला होता. डिसेंबर 2020 मध्ये त्यापेक्षा 308 टक्के जास्त म्हणजे 2193 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्यात झाली.