
सामना ऑनलाईन । जम्मू
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यास म्हणून हिंदुस्थानने पाकिस्तानात घुसून बालाकोटवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यापासून सीमेवर अधूनमधून हल्ले करण्याचे पाकड्यांनी सुरू केलेले सत्र अद्यापि सुरूच आहेत. पाकिस्तान सैनिकांनी जम्मूत राजौरी, पूँछ जिल्हय़ात तोफगोळे आणि रॉकेटचा हल्ला केला. यामध्ये राजस्थानातील नागोरीमधील हरी भास्कर हा जवान शहीद झाला. यामुळे पाकच्या हल्ल्यात एका आठवडय़ात तीन जवान शहीद झाले आहेत.
हिंदुस्थानने केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानची एक लष्करी चौकी उद्ध्वस्त झाली असून तेथे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज उलटा फडकताना दिसत आहे. याबाबतची व्हिडियो क्लीप हिंदुस्थातनने प्रदर्शित केली आहे.
प्रत्युत्तरात पाकचे मोठे नुकसान
शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यास हिंदुस्थाननेही तडाखेबंद प्रत्युत्तर दिले असून यामध्ये पाकिस्तानचे अनेक सैनिक मारले गेले आहेत. पाक लष्कराची मोठी हानी झाली आहे, मात्र याचा नेमका तपशील मिळाला नाही.
हरी भास्कर हे लष्करात ग्रेनेडिअर (हातबॉम्ब फेकणारे सैनिक) होते. भास्कर हे आघाडीवरील शाहपूर विभागातील लष्करी चौकीत बंदोबस्तावर असताना पाकड्यांनी या चौकीला तोफगोळे, रॉकेटचा मारा करून लक्ष्य केले. यामध्ये भास्कर हे गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना त्वरित जवळच्या फिल्ड हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. उधमपूर येथील लष्कराच्या मुख्यालयात त्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यावर त्यांचे पार्थिव जयपूरला विमानाने रवाना केले आहे.




























































